

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सराईत गुन्हेगारी टोळ्यांकडून लहान-मोठी वाहने खरेदी करून त्याचे सुटे भाग विक्री करणारा भंगार तस्कर विजय घाडगे (रा. लक्ष्मीनगर, माधवनगर, सांगली) हा फरारीच आहे. त्याच्या शोधासाठी सांगलीत छापे टाकण्यात आले. मात्र अजूनही त्याचा सुगावा लागला नाही.
कवलापूर (ता. मिरज) येथील रमेश बामणे यांचा 19 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर चोरीला गेला होता. बामणे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दहा दिवसात पोलिसांनी या चोरीचा छडा लावत गोपीनाथ उत्तम घाडगे (वय 30), नागराज स्वामलिंग सन्नाळे (20) व तेजस चंद्रकांत पाटील (20, तिघे रा. कोंडके मळा, कवलापूर, ता. मिरज) या तिघांना अटक केली होती.
अटकेतील या तिघांना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्यावेळी ट्रॅक्टर चोरून तो भंगार तस्कर विजय घाडगे याला विकल्याची कबुली दिली. घाडगेने तिघांना तीन लाख 20 हजाराची रोकड दिली होती. त्यानंतर घाडगेने अवघ्या तासाभरात या ट्रॅक्टरचे सुटे भाग केले. पोलिसांनी लक्ष्मीनगर परिसरात छापे टाकले. त्यावेळी तिथे काही वाहनांचे सुटे भाग आढळून आले आहेत. मात्र कवलापूरचे तिघे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच तो पसार झाला.
दरम्यान, तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले. घाडगे हा मुख्य सूत्रधार आहे. तो फार मोठा भंगार तस्कर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो जर सापडला तर वाहन चोरीचे मोठे 'रॅकेट' उघकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. लक्ष्मीनगर हे संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. तेही घाडगेच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांना मदत करीत आहेत. त्याच्या शोधासाठी एक पथक कर्नाटकात रवाना केले आहे. त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून लहान-मोठी वाहन चोरीची मालिकाच सुरू आहे. वाहने चोरल्यानंतर त्याचे तासाभरात सुटे भाग करून ते विकले जात असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. पण तस्कर कोण आहे? हे समजत नव्हते. कवलापूरचे हे प्रकरण उघडकीस आल्याने पोलिसांकडून मुळापर्यंत जावून तपास करण्याचा प्रयत्न सुरू आहे.