

इस्लामपूर; मारुती पाटील : जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुका स्थगित झाल्याने इस्लामपुरात राजकीय हालचालीही थंडावल्या आहेत. या निवडणुका कधी होणार, याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. निवडणुकीची तयारी केलेल्या अनेक इच्छुकांची निवडणुका पुढे गेल्याने चांगलीच गोची झाली आहे.
इस्लामपूर शहरात प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार यादी प्रसिद्धी या सर्व प्रक्रिया पूर्ण होवून निवडणूकही जाहीर झाली होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. नवीन प्रभाग रचनाही रद्द करून जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. शिवाय नगराध्यक्ष पदही थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. मात्र या निवडणुका नेमक्या कधी होणार, याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. त्यामुळे शहरात राजकीयस्तरावर सध्या तरी शांतता आहे.
निवडणुकीच्या तोंडावर दहीहंडी गणेशोत्सव हे सण असल्याने या उत्सवाच्या माध्यमातून राजकीय वातावरण निर्मिती करून लोकांशी संपर्क ठेवण्याचा राजकीय गटांचा प्रयत्न सुरू आहे. दहीहंडीच्या माध्यमातून महाडिक गट व मुख्यमंत्री शिंदे गटाने शक्ती प्रदर्शन केले. आता गणेशोत्सवाच्यानिमित्तानेही प्रमुख राजकीय नेतेमंडळींनी राजकीय वातावरण निर्मितीचाही प्रयत्न सुरू केला आहे.
राज्यातील सत्तेतून महाविकास आघाडी पायउतार होवून भाजप-शिवसेनेचा गट सत्तेवर आल्याने येथे भाजप व विकास आघाडीमध्ये उत्साहाचे तर राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. या सत्तांतरामुळे तसेच नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने समीकरणेही बदलणार आहेत. सत्ता हातात असल्याने विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करीत असतात.
नव्या सरकारने आता नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे. आता इस्लामपुरात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी व विकास आघाडीतही जोरदार रस्सीखेच असणार आहे.