सांगलीत चोरटा ताब्यात | पुढारी

सांगलीत चोरटा ताब्यात

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील झुलेलाल चौकातील स्वराज्य मोबाईल शॉपी आणि ऑनलाईन मनी ट्रान्सफर धारकाला 99 हजाराचा गंडा घालणार्‍या व संजय पवार यांच्यावर हल्ला करून चार लाख 80 हजाराचे दागिने जबरी चोरी करून पळालेल्या धीरज दिलीप आवरे (वय 23, रा. भोईराज हौसिंग सोसायटी) याला सांगली शहर पोलिसांनी रविवारी अटक केली.

झुलेलाल चौकात स्वराज्य मोबाईल शॉपी आणि ऑनलाईन मनी ट्रान्सफर आहे. 17 ऑगस्ट रोजी दुपारी संशयित आवरे याने स्वतःच्या नावाने बँकेच्या खात्यावर 99 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. आपल्याकडे ही रक्कम गाडीच्या डिकीत असून ती लगेचच आणून देतो, असे सांगितले. त्यानुसार मनी ट्रान्सफर करणार्‍या शंकर रेवणाप्पा कुंभार (रा.सांगलीवाडी) यांनी रक्कम वर्ग केली. आवरे याने ही रक्कम गाडीच्या डिकीतून आणण्याऐवजी त्याठिकाणाहून गाडी घेऊन पलायन केले. त्यामुळे कुंभार यांनी तत्काळ त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्या घरावरही पोलिसांनी पाळत ठेवली होती. तो घरी आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही फसवणूक केल्याची कबुली दिली. तसेच 31 मार्च 2022 रोजी संजय पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांच्या सोन्याची चेन, ब्रेसलेट असा चार लाख 80 हजारांचा ऐवज घेऊन पळवून नेल्याचे कबूल केले. पोलिस अंमलदार अमित मोरे, संदीप पाटील, विजय सुतार, दिलीप जाधव, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, डॅनियल घाटगे, झाकीर हुसेन काझी, अभिजित माळकर, अक्षय कांबळे यांनी ही कारवाई केली.

Back to top button