सांगलीत बँक व्यवस्थापकास अटक | पुढारी

सांगलीत बँक व्यवस्थापकास अटक

सांगली;  पुढारी वृत्तसेवा : मुच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या बँक व्यवस्थापक रशीद हुसेन नदाफ (वय 39, रा. शामरावनगर, डी. मार्ट पाठीमागे सांगली, मूळ रा. कुडचे माळ परिसर, इचलकरंजी) याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याची पत्नी सरोजशेख सलीम पठाण ही मात्र अद्याप पसार आहे.

संशयित रशीद नदाफ हा एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने डॉ. प्रवीण तुकाराम कदम (वय 39, रा. शामरावनगर) यांना एचडीएफसी बँकेच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. यातून तुम्हाला जादा रक्कम मिळेल, असे आमिषही दाखविले. त्यानंतर डॉ. कदम यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तीन सप्टेंबर 2021 रोजी पाच लाख 42 हजारांची गुंतवणुकीची रक्कम त्यांना दिली. ही रक्कम नदाफ याने म्युच्युअल फंडमध्ये न गुंतवता पत्नी सरोज शेख पठाण हिच्या खात्यावर जमा केली. डॉ. कदम यांना फंडातून काही रक्कम गरजेची होती.

त्यामुळे त्यांनी ही रक्कम काढण्यासाठी बँकेत जावून चौकशी केली. तेव्हा त्यांच्या नावाने कोणतीही रक्कम जमा नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी नदाफ याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे डॉ. कदम यांनी तत्काळ नदाफ याच्याविरोधात 10 डिसेंबर 2021 रोजी सांगली गुन्हा दाखल केला होता.

नदाफ हा त्या दिवसांपासून परागंदा होता. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. नदाफ हा पिंपरी चिंचवड येथील वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथून त्याला अटक केली. त्याच्यावर विश्रामबाग व कुपवाड पोलिसातही गुन्हा दाखल आहे.

Back to top button