सांगली : बांधकाम व्यावसायिकाचा खून खंडणीसाठीच | पुढारी

सांगली : बांधकाम व्यावसायिकाचा खून खंडणीसाठीच

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या सांगलीतील बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल
पाटील (वय 54) यांच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रविवारी यश आले.

याप्रकरणी कारंदवाडी (ता. वाळवा) येथील तिघांना अटक करण्यात आली आहे. खंडणीसाठी पाटील यांचे अपहरण करून खून केल्याची
कबुली संशयितांनी दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी दिली. अटक केलेल्यांमध्ये किरण लखन रणदिवे
(वय 26), अनिकेत उर्फ नीलेश श्रेणिक दुधारकर (22) व अभिजित चंद्रकांत कणसे (20, तिघे रा. कारंदवाडी) यांचा समावेश आहे. त्यांना पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  तब्बल पंधरा दिवस सांगली ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या खुनाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेर त्यांना छडा लावण्यात यश आले.

तिघांची पैशाची चणचण

संशयितांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्यांना सातत्याने पैशाची चणचण भासत होती. किरण रणदिवे यांनी अनेकांकडून हात ऊसने
पैसे घेतले होते. मात्र, त्याला या पैशाची परतफेड करता येत नव्हती. लोकांनी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. कामधंदाही काही मिळत नव्हता. चहाला त्यांच्याकडे पैसे नसायचे. यातून त्यांनी कोणाचे तरी अपहरण करून खंडणी वसूल करून पैसे कमविण्याचे ठरविले.

पाटील यांची तुंगमध्ये ये-जा

माणिकराव पाटील यांनी तुंग येथे बांधकामाचे काम घेतले होते. या कामावर ते गेल्या सहा महिन्यांपासून
दररोज जात होते. याच ठिकाणी ‘विश्रांती’ या नावाने चहा विक्रीचे दुकान आहे. तिथे पाटील चहा पिण्यास जात होते. संशयित तिथे येत होते. त्यावेळी त्यांना पाटील यांच्याकडे भरपूर पैसे असल्याचे समजले.

अपहरणाचा रचला कट

‘विश्रांती’ चहा दुकानात बसून संशयितांनी पाटील यांच्या खुनाचा कट रचला. यासाठी त्यांनी कवठेपिरान (ता. मिरज) येथील एकाचा मोबाईल चोरला. या मोबाईलवरून त्यांनी दि. 10 ऑगस्टपासून पाटील यांना प्लॉट दाखविण्याचे आमिष दाखवून फोन करण्यास सुरूवात केली. तुंग येथे स्वस्तात प्लॉट असल्याचे त्यांनी पाटील यांना सांगितले.

अखेर पाटील गेले!

संशयित पाटील यांना सातत्याने फोन करून प्लॉट पाहण्यासाठी बोलावत होते. अखेर दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता पाटील
तुंग येथे गेले. संशयितांनी मिणचे मळ्याजवळ पाटील यांना बोलावून घेतले होते.

बेदम केली मारहाण

पाटील यांना संशयितांनी घट्ट पकडून धरले. शनिवार असल्याने तुंगमध्ये मारूती मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची रस्त्यावर गर्दी
सुरू होती. पाटील यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर संशयितांनी त्यांना बेदम
मारहाण केली. यामध्ये ते बेशुद्ध पडले.

कारच्या डिग्गीत टाकले

पाटील बेशुद्ध पडताच संशयितांनी त्यांना त्यांच्याच कारच्या डिग्गीत टाकले. तेथून ते कार घेऊन कवठेपिरान, दुधगाव मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज गावी गेले. तेथील नदीकाठी त्यांनी कार लावली. पाटील यांना डिग्गीतून बाहेर काढले. त्यांची हालचाल थांबल्याचे पाहून संशयित घाबरून गेले.

हात बांधून नदीत फेकले

संशयितांनी पाटील यांचे दोन्ही पाठीमागे पाठीला घट्ट बांधले. त्यानंतर त्यांना नदीत फेकून दिले. तेथून ते पाटील यांचे कार घेऊन इचलकरंजी रस्त्यावर कोंडिग्रे फाट्यावर आले. तिथे रस्त्याकडेला पाटील यांची कार सोडून ते हातकणंगले, वाळवा तालुक्यातील शिगाव, आष्टामार्गे कारंदवाडीत आले. तिघांनी या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगायचे नाही, असे ठरवून घरी निघून गेले.

पथकासमोर लोटांगण

स्थानिक गुन्हे अन्वेषण व सांगली ग्रामीण पोलिसांचा तब्बल पंधरा दिवस तपास सुरू राहिला. अनेकांना चौकशीसाठी ताब्यात
घेतले होते. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेजही तपासले होते, पण हाती काहीच लागत नव्हते. अखेर रविवारी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला
कारंदवाडीतील संशयित तिघांनी खून केल्याची माहिती मिळाली. तिघांना ताब्यात घेण्यात आले. सुरूवातीला ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पाटील यांच्या खुनाची कबुली देत पथकासमोर थेट लोटांगणच घातले. कोंडिग्रे फाट्यावरून पाटील यांची कार जप्त करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, उपनिरीक्षक सागर पाटील, हवालदार
बिरोबा नरळे, विक्रम खोत, संदीप गुरव, निलेश कदम, अरुण औताडे, मेघराज रुपनर, आर्यन देशिंगकर, संदीप नलवडे, शशिकांत जाधव, संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी पथकाचे कौतुक केले.

दोरीचा तुकडा मिणचे मळ्याजवळ सापडला

संशयितांनी पाटील यांचे मिणचे जवळ अपहरण केले. तिथेच त्यांचे हात बांधण्याचा प्रयत्न झाला. यावेळी झालेल्या झटापटीत दोरीचा एक तुकडा पडलेला होता. हा तुकडा पोलिसांना घटनास्थळी सापडला होता. हा दोरीचा तुकडा व पाटील यांच्या मृतदेहाच्या हाताला सापडलेली दोरी एकच असल्याचे निष्पन्‍न झाले होते.

Back to top button