निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी : मंत्री डॉ. विश्वजित कदम | पुढारी

निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी : मंत्री डॉ. विश्वजित कदम

सांगली : पुढारी वृत्तसेवा

आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यात कोणतेही गट-तट न ठेवता अगदी विशाल पाटील यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांनी येथे केले.

आमदार विक्रमसिंह सावंत यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच मावळते अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार मंगळवारी काँग्रेस कमिटीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. कदम म्हणाले, सत्तेवर असताना आणि नसताना काय फरक असतो, हे कार्यकर्त्यांना कळले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा विचार टिकविला पाहिजे, हे सर्वांना पटले आहे. पक्षश्रेष्ठींनी नवीन कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तरुणांवर पक्षाची जबाबदारी सोपविली आहे. सवर्र् कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतरच विक्रमसिंह सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी व विशाल पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षाचे अतिक्रमण रोखण्यासाठी सर्वजण मिळून काम करणार आहोत. विशाल पाटील यांना बरोबर घेऊनच जिल्ह्यात पक्ष वाढविणार आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी प्रदेशाध्यक्षज्याप्रमाणे सूचना देतील त्याप्रमाणे आगामी निवडणुका लढविल्या जातील. सध्या तरी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे.

आमदार कदम म्हणाले, गटा-तटाची भाषा करू नका. जे आपल्या बरोबर आहेत, त्यांना घेऊन लढा. आमदार सावंत म्हणाले, काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील म्हणाल्या, निवडणुकीसाठी सर्वांनी गट-तट विसरून एकत्र यावे. युवकांना संधी द्यावी.

शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजप आपला मुख्य शत्रू आहे, तर राष्ट्रवादी हा अंतस्थ शत्रू आहे. आगामी काळ कसोटीचा आहे. सर्व निवडणुकांत जिंकण्यासाठी कार्यकत्यांनी एकसंघ व्हावे.

युवक नेते जितेश कदम, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजीत भोसले, नगरसेवक उत्तम साखळकर, नंदू पाटील, सौरभ पाटील, आशा पाटील, मालन मोहिते, नंदू शेळके, नंदकुमार कुंभार, नामदेव कस्तुरे, अमित पारेकर, रवी खराडे उपस्थित होते.

विशाल पाटील गटाचे मोजकेच कार्यकर्ते : जयश्री पाटील गटाचे पदाधिकारी उपस्थित

या सत्कार समारंभास विशाल पाटील गटाचे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. विशाल पाटील यांची पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड होऊनही ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांचे कट्टर समर्थकही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. जयश्री पाटील मात्र त्यांच्या गटाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

गटबाजी थांबवा : तालुकाध्यक्षांचे खडे बोल

या कार्यक्रमात बहुसंख्य तालुकाध्यक्षांनी काँग्रेसमध्ये सुरू असलेली गटबाजी थांबवावी. सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन काम करावे. नाहीतर मित्र पक्षच आपला अनेक ठिकाणी घात करेल, असा इशारा दिला. राष्ट्रवादी हा आपला अंतस्थ शत्रू आहे. त्यामुळे गट-तटाची भाषा आणि कृती थांबविली नाहीतर कॉँग्रेस आणखी रसातळाला जाईल, असा इशारा सुभाष खोत, बाळासाहेब गुरव, बाळासाहेब पाटील, हजारे, ए.डी. पाटील यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी यावेळी दिला.

Back to top button