सांगली : माधवनगर रेल्वेचा कारभार कट्ट्यावरून! | पुढारी

सांगली : माधवनगर रेल्वेचा कारभार कट्ट्यावरून!

सांगली; सचिन लाड :  माधवनगर (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या स्थानकाचा कारभार कट्ट्यावर बसून सुरू आहे. खिडक्या, दारे पळविण्यात आली आहेत. नशेखोरांसह प्रेमीयुगुलांसाठी हे स्थानक अड्डाच बनले आहे. रेल्वे प्रशासन स्थानक दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याने प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे.

दोन पॅसेंजर थांबेनात!

सांगलीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे स्थानक आहे. तीन वर्षांपूर्वी स्थानक बांधण्यात आले आहे. कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर, सातारा-कोल्हापूर व कोल्हापूर-सातारा अशा चारच पॅसेंजर रेल्वे सकाळी व सायंकाळी या स्थानकात थांबतात; पण गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर या दोन पॅसेंजर थांबत नाहीत. केवळ सातारा व कोल्हापूरला जाणार्‍या पॅसेंजर थांबत आहेत.

प्लॅटफॉर्म गायब

वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेज, दंत महाविद्यालय आयटीआय येथे शिक्षक व विद्यार्थी रेल्वेने येतात. वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार वर्गही खूप असतो. दररोज किमान तीनशे ते चारशे प्रवाशांची रेल्वेतून चढ उतार असते. मध्यंतरी रुळाची सहा इंच उंची वाढविण्यात आली. हे काम करीत असताना प्लॅटफॉर्म उखडला गेला. तो नव्याने बांधलाच नाही. परिणामी प्रवाशांना रेल्वेतून चढ-उतार करताना खूप त्रास होत आहे.

चोरट्यांचा धुमाकूळ

या स्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने चोरट्यांनी धुमाकूळ घालत स्थानकाच्या इमारतीची मोडतोड केली. प्रवाशांना बसण्यास ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या बाकड्यांची मोडतोड केली. इमारतीचे दरवाजे व खिडक्या पळवून नेल्या आहेत. लोखंडी बॅरेकेटही पळवून नेले आहेत. स्थानकाचे पत्रेही लंपास केले आहेत. सभोवताली काटेरी झुडुपे व गवत उगवले आहे. पावसाचे पाणी साचूून राहिले आहे. स्थानकात जाताही येत नाही, अशी अवस्था आहे.

तिकटी विक्री कट्ट्यावर!

प्रशासनाने तिकीट विक्रीसाठी इम्रान मुल्ला यांना ठेका दिला आहे. मुल्‍ला रेल्वे येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर येतात. त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने ते कट्ट्यावर बसून तिकीट विक्री करून निघून जातात. सध्या दोनच पॅसेंजर थांबत असल्याने मुल्ला यांना तिकीट विक्रीच्या कमिशनमधून महिन्याकाठी दीड हजार रुपयेही पगार पडेना झाला आहे.

कृती समितीची स्थापना

कामगार, विद्यार्थी तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना हे स्थानक सोयीचे आहे. त्यामुळे हे स्थानक सुसज्ज करावे, यासाठी माधवनगर येथे रेल्वे कृती समितीची स्थापनाही झाली आहे. समितीने याप्रश्‍नी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाने स्थानकाची पाहणीही केली. पण पुढे काहीच हालचाली नाहीत.

निरोध, नशेच्या गोळ्यांचा पडलाय खच!

स्थानक दोन खोल्यांचे आहे. एक खोलीतून पूर्वी कारभार चालत होता. दुसर्‍या खोलीत प्रवाशांना बसण्याची सोय होती. या दोन्ही खोल्यांमध्ये सध्या निरोध व नशेच्या गोळ्यांचा खच पडलेला आहे. प्रेमीयुगुलांसाठी हे स्थानक अड्डाच बनले आहे. नशेबाजांच्या सायंकाळनंतर पार्ट्या रंगलेल्या असतात. विजेची कोणतीही सोय नाही.

Back to top button