सांगली-सोलापूर मार्गावर टोलवसुली सुरू; बोरगाव, अनकढाळ, इंचगावला टोलनाके | पुढारी

सांगली-सोलापूर मार्गावर टोलवसुली सुरू; बोरगाव, अनकढाळ, इंचगावला टोलनाके

कवठेमहांकाळ / सांगोला; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-नागपूर (क्र. 166) राष्ट्रीय महामार्गावर सांगली-सोलापूर हद्दीत तीन टोलनाक्यांवर मंगळवारपासून (दि. 16 ऑगस्ट, सकाळी 8 वाजल्यापासून) टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), सोलापूर जिल्ह्यातील अनकढाळ व इंचगाव येथील तीनही टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. हलक्या चारचाकी वाहनांना प्रत्येक टोलनाक्यावर 75 रुपये, बसेसना प्रति टोलनाका 245 रुपये, तर अवजड वाहनांना 470 रुपये प्रत्येक नाक्यावर मोजावे लागणार आहेत. याचा साहजिकच प्रवासी तिकीटदरात वाढ होऊन प्रत्येक प्रवाशाच्या खिशावर भुर्दंड पडणार आहे.

या रस्त्यांवर सांगली जिल्ह्यात बोरगाव तर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अनकढाळ तसेच इंचगाव हे दोन टोलनाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती टोलनाका व्यवस्थापनाने प्रसिद्ध केली आहे. त्याप्रमाणे 16 ऑगस्ट रात्री एक वाजल्यापासून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. साहजिकच याचा भुर्दंड सर्व प्रकारच्या वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे.

कामे अर्धवट, तरीही टोलवसुली

अद्याप काही ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्गासह गावांना जोडणार्‍या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. घोरपडी-जुनोनीजवळ रस्त्याचे सुमारे 100 मीटरपेक्षा जास्त काम अपूर्ण असून खाचखळग्याचा रस्ता आहे. अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत, सर्व सोयी-सुविधांची पूर्तता नाही. तरीही टोलवसुली करण्यात येत असल्याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.

टोलमाफीची मागणी

परिसरातील 20 किमीच्या आतील स्थानिक बिगर व्यावसायिक वाहनांना 315 रुपयांचा मासिक पास काढावा लागणार आहे. हा पास प्रत्येक महिन्याला काढावा लागणार आहे. त्यामुळे एकदा हा नियम लागू करण्यात आला की तो कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या टोलमाफीचा संदर्भ घेऊन अनकढाळ टोल नाका येथे स्थानिक चारचाकी वाहनांना टोल माफी द्यावी. स्वतंत्र लेन निर्माण करावी, अशी मागणी पुढे येत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लोकांना टोलमधून माफी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनकढाळ टोलनाका प्रशासनाकडून टोलमाफी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली जात आहे.

टोलनाक्याची दरसूची

कार, जीप, प्रवासी वाहन प्रत्येक फेरीसाठी 75 रुपये तर परतीच्या प्रवासासह प्रत्येक फेरीसाठी 110 रुपये, मासिक पास शुल्क 50 फेर्‍यांसाठी 2430 रुपये. जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 35 रुपये आकारणी आहे. तर हलके वाणिज्य वाहन, मीनी बस प्रत्येक फेरीसाठी 120, परतीसाठी 175, तर मासिक फेरीसाठी वैधता 3930 रुपये. जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाणिज्य वाहनांसाठी 60 रुपये. ट्रक, बस प्रत्येक फेरीसाठी 245 रुपये, परतीच्या फेरीसह 370, मासिक पास शुल्क 8230. तसेच जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 125, व्यावसायिक वाहनांसाठी प्रत्येक फेरी 270 परतीच्या प्रवासासह 405 रुपये. मासिक पास 8980 तसेच जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 135, तसेच जड व्यवसायीक वाहने प्रत्येक फेरीसाठी 385 रुपये परतीच्या प्रवासासह प्रत्येक फेरी 580, मासिक पास 12905 तसेच जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 195 रुपये. अवजड वाहने प्रत्येक फेरी 470 रुपये, परतीच्या प्रवासासह प्रत्येक फेरी 705, मासिक पास 15715. जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 235 रुपये असे दर आहेत.

या गावांना सोसावा लागणार भुर्दंड

नाझरा टोलनाक्याच्या परिसरात वाटंबरे, अजनाळे, कमलापूर, राजूरी, उदनवाडी, पाचेगाव, झापाचीवाडी, चोपडी, नाझरे, वझरे, बलवडी, चिणके, अनकढाळ, निजामपूर, यलमार मंगेवाडी, गोडसेवाडी, केदारवाडी, अकोला, वासूद कडलास यासह वीसहून अधिक गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे 20 किलोमीटर अंतराच्या आतील आहेत. यामुळे या गावांना रोज या टोलनाक्यावरून ये-जा करावी लागत असल्याने त्या गावांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील सांगली-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार बोरगाव, अनकढाळ व इंचगाव जवळील टोल नाके 16 ऑगस्ट सकाळी 8 वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहेत. अर्धवट रस्त्याची कामे लवकरच पूर्णत्वास येतील. या महामार्गामुळे विकासाला नवी चालना मिळणार आहे.- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Back to top button