सांगली : बांधकाम व्यावसायिक खून प्रकरण : तुंगमधील पती-पत्नी ताब्यात | पुढारी

सांगली : बांधकाम व्यावसायिक खून प्रकरण : तुंगमधील पती-पत्नी ताब्यात

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांच्या खूनप्रकरणी तुंग (ता. मिरज) येथील पती-पत्नीला शुक्रवारी सांगली ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेे. या खुनात त्यांच्या सहभागाची दाट शक्यता असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

जिवंतच फेकले

पाटील यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना त्यांच्याच कारमधून कुंभोज (ता. हातकणंगले) येथे नेण्यात आले. तिथे त्यांना एका शेतात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे दोन्ही हात दोरीने घट्ट बांधून जिवंतच नदीत फेकून आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

तुंगमध्ये जोरदार झटापट

दि. 13 ऑगस्ट रोजी तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्यापासून पाटील यांचे अपहरण करण्यात आले. तिथेच पाटील यांचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी झालेल्या झटापटीत गळ्याभोवती आवळलेली दोरी तिथेच पडली. ही दोरीही पोलिसांना मिळाली
आहे. रस्त्यावरून वाहने जात असल्याने संशयितांनी पाटील यांची ‘गेम’ अन्यत्र करण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्यांना त्यांच्याच कारमध्ये घालून कुंभोज येथे नेण्यात आले.

मोपेडवरून पाठलाग

तुंगपासून ते कुंभोजपर्यंत कारच्यामागे एक पांढर्‍या रंगाची अ‍ॅक्टिव्हा (मोपेड) पाठलाग करीत होती. ही मोपेड सातत्याने कारभोवती पुढे-मागे करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. पाटील यांची कार व मोपेड स्पष्टपणे दिसते. पण कारमध्ये कोण आहे, हे दिसत नाही. मोपेडवरील संशयित व्यक्ती 30 ते 35 वयोगटातील आहे.

शेतात बेदम मारहाण

अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिस यंत्रणा रात्रं-दिवस झटत आहे. सांगली ग्रामीण, पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील ‘टीम’ तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपासात गुंतून आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पाटील यांना नदीत फेकले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. पाटील यांना दररोज व्यायाम करण्याची सवय होती. ते सांगलीत दररोज एका व्यायाम शाळेत जात होते. पोलिसांनी शुक्रवारी या व्यायाम शाळेत जाऊनही चौकशी केली.

घटनेदिवशी पाटील यांच्या संपर्कात कोण-कोण आले होते, त्या सर्वांची आतापर्यंत चौकशी झाली आहे. पण अजूनही ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत.

दाम्पत्याचा चौकशीला प्रतिसाद मिळेना!

तुंग येथील पती-पत्नीला चाौकशीसाठी ताब्यात घेतले असले, तरी त्यांच्याकडून चौकशीला प्रतिसाद मिळेना झाला आहे. दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. त्यांचे काही महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पाटील स्वत: करीत होते. त्यांचे बांधकामाच्या साईटवर रोज जाणे-येणे होते. त्यामुळे त्यांची या कुटुंबाशी जवळीकता वाढली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Back to top button