कामांच्या निधीसाठी केव्हाही फोन कर; मुख्यमंत्री शिंदे यांचा आर. आर. आबांच्या मुलाला शब्द | पुढारी

कामांच्या निधीसाठी केव्हाही फोन कर; मुख्यमंत्री शिंदे यांचा आर. आर. आबांच्या मुलाला शब्द

तासगाव; दिलीप जाधव : माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील हे माझे सहकारी होते. त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तुझ्या मतदारसंघातील कोणत्याही विकास कामासाठी निधी हवा असेल तर थेट मला फोन करून सांगायचे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आबांचे सुपुत्र रोहित आर. आर. पाटील यांना कोल्हापूर येथे दिला.

आमदार अनिल बाबर यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आलेले असताना कोल्हापूर विमानतळावर रोहित आर. आर. पाटील यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी निधीची कमतरता भासून देणार नसल्याची ग्वाही यावेळी दिली.

या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी रोहित पाटील यांच्याकडून मतदारसंघातील प्रस्तावित विविध विकासकामांच्या बाबतची माहिती घेतली. तसेच या विकासकामांना निधी मिळण्यासाठी काही अडचणी येत असतील तर थेटपणे मला फोन करायचा किंवा येऊन भेटायचे, असा शब्द दिला.

दरम्यान, दौर्‍यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तासगाव येथील आर. आर. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. आमदार सुमनताई पाटील, आबांचे बंधू सुरेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले.

Back to top button