अतिरिक्त सीईओपदी निखिल ओसवाल; गुडेवार औरंगाबादचे विभागीय उपायुक्त | पुढारी

अतिरिक्त सीईओपदी निखिल ओसवाल; गुडेवार औरंगाबादचे विभागीय उपायुक्त

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार यांची औरंगाबाद येथे विभागीय उपायुक्तपदी बदली झाली आहे. तर त्या जागी अहमदनगर जिल्हा परिदषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांची नियुक्ती झाली आहे. कराड तालुक्यातील मसूर हे त्यांचे मूळ गाव आहे. बुधवारी ते पदभार स्वीकारणार असल्याची शक्यता आहे.

अतिरिक्त सीईओ गुडेवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामांचा धडाका सुरू केला होता. कामांत गैरप्रकार, मनमानी करणार्‍या ठेकेदार आणि अधिकार्‍यांना त्यांनी दणका दिला होता. त्यांच्या दहशतीने अनेक कामांना शिस्त आली होती. काही प्रकरणावरून पदाधिकारी, सदस्य विरुद्ध गुडेवार असा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही अनेक वेळेला वाद झाला होता. गुडेवार यांनी कार्यकाळ संपल्याने पुणे, मुंबई येथे विनंती बदली मागितली होती. मात्र त्यांची बदली औरंगाबाद विभागीय कार्यालयात उपायुक्तपदावर झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेमध्ये दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे.

Back to top button