कोयना धरणातून पाणी सोडले; सहा वक्री दरवाजे दीड फुटावर | पुढारी

कोयना धरणातून पाणी सोडले; सहा वक्री दरवाजे दीड फुटावर

पाटण; पुढारी वृत्तसेवा : 105.25 टी.एम.सी. पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाणी सामावून घेण्याची क्षमता, आगामी काळातील पाऊस, सध्याची पाणी आवक लक्षात घेता. पूर्वेकडे संभाव्य महापुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलून त्यातून 8,000 व धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून 2,100 असे प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदी पात्रात एकूण 10,100 क्यूसेक (दोन लाख 85 हजार 931 लिटर) पाणी सोडण्यात आले आहे.

पूर्वेकडील विभागात पडणार्‍या पावसामुळे कोयना नदी पाणी पातळीत वाढ झाली होती. धरणात यापुढे पडणारा पाऊस व येणार्‍या पाण्याची आवक वाढली तरच यापेक्षा जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
गुरुवारी सायंकाळी पाच ते शुक्रवार सायंकाळी पाच या चोवीस तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे – कोयना 162 मि.मी., नवजा 126 मि.मी. व महाबळेश्वर 288 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाची स्थिती एकूण पाणीसाठा 88.97 टी.एम. सी. आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 16.28 टीएमसी पाण्याची गरज आहे. मागील चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 3.76 टीएमसी ने तर पाणीउंचीत 3.10 फूट वाढ झाली आहे.

दरम्यान मागील दोन दिवसांपेक्षा शुक्रवारी कोयना धरणांतर्गत विभागासह पूर्वेकडील पाटण तालुक्यातही पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. धरणांतर्गत विभागातून येणार्‍या पाण्याची आवकही घटत आहे.

Back to top button