सांगलीचा व्यापारी ओडिशात जेरबंद | पुढारी

सांगलीचा व्यापारी ओडिशात जेरबंद

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील व्यापारी दशरथ सावकार याला ओडिशामधील पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून सव्वा कोटीची रोकड व 20 सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत. गांजा तस्करीप्रकरणी बसमध्ये तपास करत असताना हे घबाड पोलिसांच्या हाती लागले.

बेहरामपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून हा तपास आता आयकर विभागाकडून करण्यात येणार आहे. यामागचे सांगली कनेक्शन काय? याचा तपास सुरू आहे. तेथील आयकर विभाग व पोलिस येत्या दोन दिवसात सांगलीत तपासासाठी दाखल होणार आहे.

बसमधून गांजा तस्करी केली जात असल्याची माहिती ओडिशातील बेहरामपूर पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करून तपास सुरू केला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दशरथ सावकार नावाच्या एका व्यापार्‍याला ताब्यात घेतले आहे. हा व्यापारी सांगलीतील आहे. बेहरामपूरच्या आनंद ज्वेलर्स या दुकानात हे सोने देण्यासाठी तो येत होता. त्यावेळी बेहरामपूर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला. या व्यापार्‍याकडे सापडलेल्या रोख रकमेतील सर्व नोटा पाचशे रुपयांच्या आहेत.

बेहरामपूर पोलिसांनी या कारवाईची माहिती आयकर विभागाला दिली. पुढील तपासाची सुत्रे आयकर विभागाने हाती घेतली आहेत. या व्यापार्‍याकडे सापडलेली रक्कम ही हवालासाठी वापरण्यात येत होती काय? याचा तपास आता करण्यात येणार असल्याचे आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

सोन्याच्या 20 बिस्किटांचे वजन हे जवळपास अडीच किलो इतके आहे. हे सोने त्याने स्मगलिंगच्या माध्यमातून मिळवले आहे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या व्यापार्‍याचे सांगली कनेक्शन काय आहे? याचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. सांगली पोलिसांनीही या प्रकरणाची गुरुवारी माहिती घेतली.

Back to top button