सांगली : वारणा पात्राबाहेर; कृष्णेचे पाणी वाढले | पुढारी

सांगली : वारणा पात्राबाहेर; कृष्णेचे पाणी वाढले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात व धरण परिसरात पाऊस सुरूच आहे. चांदोली धरणातून विसर्ग 5,628 करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शिराळा तालुक्यातील अनेक पूल, बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णेचे पाणी एका रात्रीत दहा फूट वाढले आहे. सांगलीत आर्यविन पुलाजवळ मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी 19 फूट होती. कोयना धरणातूनही पाणी कोणत्याही क्षणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी बुधवारी जादा वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 24 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या मध्यम व जोरदार सरी कोसळल्या. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 70.3 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे: मिरज -21.6 (285.4), जत- 5.6 (265.2), खानापूर-विटा -15.8 (339.6), वाळवा-इस्लामपूर -35.5 (419.1), तासगाव- 16.1 (280.3), शिराळा- 70.3 (802.3), आटपाडी- 6.9 (214.5), कवठेमहांकाळ – 14.2 (372.2), पलूस – 20.2 (256.8 ), कडेगाव- 22.3 (332.8).

धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. आज दिवसभरात कोयना येथे 92, नवजाला 64, महाबळेश्‍वरला 102 व चांदोलीत 37 मिमी असा मुसळधार पाऊस झाला. यामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 64 हजार क्यूसेक पाणी येत आहे. तर चांदोलीत 15 हजार क्यूसेक पाणी येत आहे. यामुळे धरणे गतीने भरू लागली आहेत. पाऊस असाच पडत राहिला तर कोयनातून विसर्ग सुरू करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले.

धरणांतील पाणीसाठा व विसर्ग

कोयना धरणात 75.48 टीएमसी साठा असून विसर्ग सुरू केलेला नाही. चांदोली धरणात 30.53 टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणातून सायंकाळी 5628 क्यूसेक विसर्ग केला आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणात 117.376 टीएमसी साठा आहे. या धरणात प्रतिसेकंद आवक 79,492 असून जावक 1 लाख 25 हजार केली आहे.

विविध पुलांजवळील पाणीपातळी (फूट इंचामध्ये)     

(धोका पातळी/आत्ताची पातळी)
कृष्णा पूल कराड-              (55.0)/13.9
भिलवडी पूल –                   (53 )/21.1
आर्यविन-                          (45)/18.6
राजापूर बंधारा –                 (58)/32.11
राजाराम बंधारा-                 (43)/38.2

Back to top button