सांगली : खोजनवाडी, उमराणी परिसराला पावसाने झोडपले; शेती पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

सांगली : खोजनवाडी, उमराणी परिसराला पावसाने झोडपले; शेती पिकांचे मोठे नुकसान

जत ; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील उमराणी, खोजनवाडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी या परिसराला शुक्रवारी सकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे द्राक्षबागा उन्मळून पडल्या आहेत. वेगाच्या वाऱ्यामुळे पिके जमीनदोस्त झाले आहेत. दरम्यान, मुचंडी- दरीबडची या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती.

गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून रिमझिम पावसास सुरुवात होती. मात्र, शुक्रवारी सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ओढे- नाले खळखळून वाहू लागले. या दरम्यान दुसरीकडे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील मका पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तर पत्रावजा असणाऱ्या घरे वाऱ्यामुळे पडली आहेत. परिणामी या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुचंडी दरीबडच्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने दिवसभर येथे पुराचे पाणी वाहत होते. दरम्यान, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, अशी माहिती शेतकरी श्रीकांत कत्ती यांनी ‘दैनिक पुढारी’ शी बोलताना दिली आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार सावंत यांनी काही भागात जावून प्रत्यक्ष पाहणी करून महसूल प्रशासन व कृषी विभाग यांनी बाधित क्षेत्राचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  पंचनामे वस्तुनिष्ठ व नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये याची खबरदारी संबंधित विभागांनी घ्यावी. अशी सूचना आमदार सावंत यांनी दिल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button