सांगली : मिरजेत पोलिसांना धक्काबुक्की; लाईनयार्ड फाडले | पुढारी

सांगली : मिरजेत पोलिसांना धक्काबुक्की; लाईनयार्ड फाडले

मिरज; पुढारी वृत्तसेवा : शहरातील उत्तमनगर परिसरात रेल्वेब्रिजवर धिंगाणा घालणार्‍या तरुणांना हटकल्याने तरुणांनी पोलिसांवर हल्ला करून शिवीगाळ केली. यावेळी वर्दीचे लाईनयार्ड फाडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई अजितसिंह बाबासो कोळेकर यांनी राहुल लहू माळगे (वय 38, रा. दत्तवाड, ता. शिरोळ), उमेश व्हळाप्पा कांबळे (वय 36) आणि महेश कल्लाप्पा कांबळे (वय 36, दोघे , रा. दानवाड, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील तिघे संशयित हे रविवारी मध्यरात्री उत्तमनगर येथील कोल्हापूर रेल्वेब्रिजवर कारमध्ये बसून धिंगाणा घालत होते. त्यावेळी पोलिस शिपाई अजितसिंह कोळेकर आणि पोलिस हवालदार गुरव असे दोघे रात्री गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना तिघे संशयित (एम.एच. 09 एफ.जे -8416) कारमध्ये बसून धिंगाणा घालत असल्याचे आढळून आले.

त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जावून “तुम्ही इथे का उभे आहात, आरडाओरडा का करीत आहात, तुम्ही येथून जावा”, असे सांगितले. त्यावेळी राहुल माळगे याने “तुम्ही होमगार्ड आहात की कोण आहात? तुमचा बिल्ला नंबर सांगा, मी तुमच्या साहेबांना फोन करतो व तुमची नोकरी घालवतो, मी खालच्या जातीचा आहे, तुमच्यावरती अ‍ॅट्रॉसिटी दाखल करतो”, असे म्हणून पोलिस कोळेकर यांच्या वर्दीचे लाईनयार्ड ओढले. त्यामुळे लाईनयार्ड फाटले गेेले. त्यानंतर उमेेश कांबळे याने पोलिस हवालदार गुरव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तिघांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Back to top button