सांगली : वाळव्यात विकास आघाडी संपणार? | पुढारी

सांगली : वाळव्यात विकास आघाडी संपणार?

इस्लामपूर; मारुती पाटील : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात उदयाला आलेल्या समविचारी पक्ष व गटांच्या विकास आघाडीचे अस्तित्व या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राहणार नसल्याचे संकेत आहेत. आघाडीतील बहुतांश नेते भाजपमध्ये गेल्याने तर काहींजण राष्ट्रवादीत गेल्याने आगामी निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

राष्ट्रवादी पक्ष तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या तालुक्यातील सर्व विरोधकांना एकत्रित करून गेल्या तीन- चार पंचवार्षिक निवडणुकांत विकास आघाडीचा उदय झाला होता. या आघाडीत भाजप, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, काँग्रेस पक्षाचे काही गट, महाडिक गट, हुतात्मा गट, माजी मंत्री शिवाजीराव नाईक गट यांचा समावेश होता. ही आघाडी स्थापन करण्यात प्रामुख्याने स्व. नानासाहेब महाडिक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, वैभव नायकवडी, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव पवार, दि.बा. पाटील आदी नेत्यांचा यामध्ये पुढाकार होता.

या विकास आघाडीने तालुक्यात जिल्हा परिषद – पंचायत समिती, तसेच इस्लामपूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगली लढतही दिली आहे. आघाडीच्या एकीने इस्लामपूर पालिकेत सत्तांतरही घडले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मात्र शिवसेना पक्ष या आघाडीत नव्हता. काँग्रेसचा एक गट स्वतंत्र तर एक गट राष्ट्रवादीसोबत लढला. आता मात्र तालुक्यातील राजकीय समीकरणे बरीचशी बदलली आहेत. आघाडीसाठी पुढाकार घेणारे नानासाहेब महाडिक यांचे निधन झाले. शिवाजीराव नाईक भाजपमधून राष्ट्रवादीत गेले. राजू शेट्टी हे ही महाविकास आघाडीसोबत गेले होते. काँग्रेस, शिवसेना हे पक्ष राष्ट्रवादीसोबत राहून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून लढविणार असल्याची चर्चा आहे.

या सर्व घडामोडीत आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना भाजप समवेत आहे. तर राहुल महाडिक, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, विक्रम पाटील, जयराज पाटील, सागर खोत हे सर्व युवा नेते भाजप पक्षात सक्रिय आहेत. हुतात्मा गटाचे गौरव नायकवडी यांनी शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविली असली तरी त्यानंतर मात्र त्यांची जास्त भाजपशी जवळीक आहे.

Back to top button