सांगली : आबा – काका गट पुन्हा आमने-सामने; काँग्रेसची निर्णायक भूमिका | पुढारी

सांगली : आबा - काका गट पुन्हा आमने-सामने; काँग्रेसची निर्णायक भूमिका

तासगाव; दिलीप जाधव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहेत. दोन सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी आणि एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आर. आर. आबा गट व खासदार संजय पाटील गट आमने-सामने येऊन चुरशीच्या लढती होणार आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अमित पाटील, राजीव मोरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे तर शिवसेनेचे तासगाव तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी सुरू केली आहे.

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या मांजर्डे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या धनश्री मोहन पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपाचे विसापूर विभागाचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या पत्नी अनुराधा पाटील या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. वायफळेच्या संध्याराणी सुखदेव पाटील यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या गटात काँग्रेसच्या राजीव मोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव असलेल्या सावळज गटात राष्ट्रवादीकडून युवक राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. आर. आर. आबांच्या पश्चात कार्यकर्ते पक्ष सोडून गेले असताना ताजुद्दीन तांबोळी हे मात्र पक्षासोबत होते. हीच त्यांची जमेची बाजू आहे. सावळजचे माजी उपसरपंच अनिल थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने व नितीन तारळेकर यांचीही नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. भाजपाकडून दिलीप देसाई आणि सावळजचे विद्यमान उपसरपंच संजय थोरात यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. या मतदारसंघातही काँग्रेसच्या राजीव मोरे यांना मानणारा एक मोठा गट आहे.

सलग दुसर्‍यांदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असलेल्या चिंचणी गटातून माजी आमदार स्व. दिनकर आबा पाटील यांचे नातू अक्षय पाटील हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय आरवडेचे सरपंच युवराज पाटील यांचे सुध्दा नाव चर्चेमध्ये आहे. भाजपकडून खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे लाँचिंग होऊ शकते. खासदार संजय पाटील यांचे पुतणे असलेल्या अमित पाटील यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या विसापूर गटामध्ये माजी जि.प. सदस्य अर्जुन पाटील यांच्या पत्नी मंदाकिनी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रबळ दावेदार आहेत. भाजपकडून तासगाव पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील जाधव यांच्या पत्नी अमृता जाधव आणि अर्चना धनाजी चव्हाण यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या येळावी गटातून माजी आमदार स्व. बाबासाहेब पाटील यांचे नातू आणि पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील यांचे सुपुत्र अमित पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजपकडून तासगाव पंचायत समितीचे माजी सदस्य उमेश पाटील तर राष्ट्रवादीकडून डी. के. पाटील इच्छुक आहेत.

पुनर्ररचनेनंतर नवीन तयार झालेला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या कवठेएकंद गटातून राष्ट्रवादीचे सर्जेराव बाबुराव पाटील व सिराज मुजावर हे इच्छुक आहेत. तर भाजपकडून कुमठे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच महेश पाटील, बाळासाहेब पवार आणि दीपक घोरपडे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश पाटील, शेकापचे बाबुराव लगारे यांची नावे इच्छुकांच्या यादीमध्ये आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी तर कवठेएकंद या गटातूनच निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

मणेराजुरीत अनेकजण दावेदार!

सलग दुसर्‍यांदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला राहिलेल्या मणेराजुरी गटात राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार यांची दावेदरी प्रबळ मानली जात आहे. तर याशिवाय प्रवीण पवार, पंचायत समितीचे माजी सभापती संजय जमदाडे, मणेराजुरीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव कलढोणे हे निवडणूक लढवू शकतात. भाजपकडून तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, खासदार संजय पाटील यांचे कट्टर समर्थक शशिकांत जमदाडे, सचिन जमदाडे, प्रदीप पवार यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गटातून शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने यांनीही दंड थोपटायला सुरुवात केली आहे.

Back to top button