Sanket Sargar : सांगली जिल्ह्यातील संकेतने इंग्लंडमध्ये फडकविला तिरंगा | पुढारी

Sanket Sargar : सांगली जिल्ह्यातील संकेतने इंग्लंडमध्ये फडकविला तिरंगा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे सुरू असणार्‍या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत येथील संकेत सरगर (Sanket Sargar) याने वेटलिफ्टिंगमध्ये 55 किलो गटात रौप्यपदकावर आपले नाव कोरले. शनिवारी दुपारी हे वृत्त समजताच जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी एकच जल्लोष केला. दरम्यान, संकेतच्या या चंदेरी कामगिरीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणारा जिल्ह्यातील दुसरा खेळाडू ठरला. या आधी 1970 मध्ये हिंदकेसरी मारुती माने यांनी राष्ट्रकुलमध्ये कुस्तीत रौप्यपदक पटकावले होते.

प्रतिकुल परिस्थितीत सातत्याने खडतर सराव करून संकेतने (Sanket Sargar) हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणचे, घरची परिस्थिती कमालीची बिकट, लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची झालेली आर्थिक कोंडी व अन्य समस्या असतानाही त्याने आपल्या सरावात खंड पडून दिला नाही. यातूनच त्याने देशासाठी रौप्यपदक मिळवले.

संकेत (Sanket Sargar)  येथील दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये सराव करतो. शनिवारी दुपारपासूनच या ठिकाणी त्याचे सहकारी मित्र, कुटुंबीय, त्याचे प्रशिक्षक मयूर सिंहासने आदी स्पर्धेचे दूरचित्रवाणीवर थेट प्रसारण पाहत होते. संकेतने दुपारी 3 वाजता आपली कामगिरी फत्ते केली. संकेत रौप्यपदकाचा मानकरी ठरल्याचा निकाल डिस्प्लेवर झळकला. याबरोबर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. पेढे-मिठाईचे वाटप करून एकमेकांना पेढे भरून सर्वांनी आनंद व्यक्‍त केला. संकेतचे वडील मारुती सरगर, आई आणि बहीण काजोल यांना आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या मुलाने रौप्य पदकावर नाव कोरल्याने संकेतच्या कुटुंबीयांना एकच आनंद झाला. संकेत हा सांगली जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचा खेळाडू आहे.

कासेगाव शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये तो शिकत आहे. संकेतने 55 किलोग्रॅम वजनी गटामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना हे यश संपादन केले. 2013 पासून गुरुवर्य दिवंगत नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्विजय इन्स्ट्यिूटमध्ये वयाच्या 13 च्या वर्षांपासून वेटलिफ्टींगचे धडे घेऊ लागला. सन 2017 पासून शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. मयूर यांची सन 2010 ची दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा अपरिहार्य कारणामुळे हातातून गेल्याचे शल्य मनात होते. त्यावेळीपासून त्यांना सन 2017 पासूनच बर्मिंगहॅम 2022 राष्ट्रकुलमध्ये आपल्या खेळाडूला पदक मिळवून द्यायचेच या वेडाने पछाडलेले होते. संकेतच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी योग्य ताळमेळ घालत नियोजन केले. सन 2018 पासून त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात केली. खडतर मेहनतीमुळे सन 2019 ते 2020 मध्ये तो फुल्लफॉर्ममध्ये पोहोचला. या काळात अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवले. जानेवारी 2020 ते मार्च 2020 दरम्यान सलग 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय उच्चांकही नोंदवले. यातूनच त्याची भारत सरकारच्या ‘स्कीम टॉप्स्’ मध्ये निवड झाली.

इंडीयन वेटलिफ्टींग फेडरेशनने फेब्रुवारी 2021 मध्ये त्याची नॅशनल कॅम्पसाठी निवड केली. सिलेक्शनचे पत्र पाठवले. फेब्रुवारी 2022 मध्ये सिंगापूर राष्ट्रीय स्पर्धेत त्याने राष्ट्रकुलमधील उच्चांकी कामगिरी नोंदवित बमिर्ंंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्‍चित केले. मात्र जुन्या दुखापतीने ऐन स्पर्धेत पुन्हा डोके वर काढले. यामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले.

दरम्यान, संकेतच्या यशामुळे जिल्हाभरातील विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले. संकेतला आष्टा महाविद्यालयाने दत्तक घेवून खेळाच्या सर्व सुविधा पुरविल्याचे प्राचार्य डाँ. राजेंद्र कुरळपकर यांनी सांगितले. संकेतचे यश ही बाब महाविद्यालय आष्टा शहर, कासेगाव शिक्षण संस्था व राज्यासाठी अभिमानाची आहे. संकेतचे मुळ गाव सांगोला तालुक्यातील जुनोनी आहे. संस्थेचे मार्गदर्शक व माजी मंत्री आमदार जयंत पाटील, अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, युवा नेते प्रतीक पाटील, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आक्रम मुजावर, सर्व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.

ऑलिम्पिकमध्येही संकेत पदक पटकावेल : वडील मारूती सरगर

संकेतचे वडील मारुती सरगर हे पानपट्टी, वडापावचा व्यवसाय करतात. सरगर कुटुंबिय हे मुळेच सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील! पोटापाण्यासाठी हे कुटुंब सांगलीत आले. आज आपल्या संकेतने जगात सांगलीचे नाव पोहोचवले, हिंदकेसरी मारुती माने यांच्यानंतर जिल्ह्यास राष्ट्रकुल स्पर्धत सहभागाचा मान मिळवून दिला, तसेच जिल्ह्यास रौप्यपदक पटकावून दिले. संकेतच्या या यशाचा आम्हा कुटुंबियांना अभिमान आहे. आता ऑलिंम्पीकमध्ये देखील संकेत नक्कीच पदक पटकावेल असा विश्‍वास त्याचे वडील मारुती सरगर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

लॉकडाऊनमध्ये संकेतने घरीच गिरवले ऑनलाईन प्रशिक्षणाचे धडे

कोरोनाकाळ तसेच लॉकडाऊनमध्ये त्याच्या सरावात काहीसा खंड पडला. मात्र मयूर सिंहासने यांनी व्यायामाचे साहित्यच त्याच्या घरी पाठवले. मोबाईलवरुन त्याचे प्रशिक्षण सुरू होते. मात्र ऑगस्ट 2020 मध्ये सरावादरम्यान, त्याच्या कमरेस गंभीर दुखापत झाली. स्पाँडीलोलायसिसचा त्याला मोठा धोका निर्माण झाला. मात्र राज्य वेटलिफ्टींगच्या क्रिडा मार्गदर्शक मधुरा टोळे यांनी मुंबईचे डॉ. किरण नारे यांचा सल्ला घेण्यास सुचविले. डॉ. किरण नारे यांनी 2 महिने ऑनलाईन व्यायामासाठी मार्गदर्शन केले. त्याची कंबरदुखी कमी झाली.

हिंदकेसरी मारुती माने यांच्यानंतर संकेतचा यशाचा झेंडा

संकेत हा हिंदकेसरी मारुती माने यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सहभाग घेणारा संकेत हा सांगली जिल्ह्यातील दुसरा खेळाडू ठरला आहे. या आधी सन 1970 मध्ये मारुती माने यांनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. आज तब्बल 52 वर्षानी सांगलीच्या एका खेळाडूने राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत पदक मिळवले.

Back to top button