सांगली : ११ कोटी रुपयांचा कर चुकवला; तिघांवर गुन्हा | पुढारी

सांगली : ११ कोटी रुपयांचा कर चुकवला; तिघांवर गुन्हा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील पंडित अ‍ॅटोमोटिव्ह कंपनीने सरकारचा व्हॅट आणि त्यावरील व्याज असे सुमारे 10 कोटी 82 लाख 20 हजार रुपये रक्कम न भरल्याप्रकरणी कंपनीच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद राज्य कर उपायुक्‍तकविंद काशिनाथ रणमोडे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान, याप्रकरणी विजय श्रीकांत गोखले, शिरीष नारायण जोशी आणि अभिजित श्रीधर देशपांडे (सर्व रा. पुणे) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, पंडित अ‍ॅटोमोटिव्ह या कंपनीकडून कार आणि त्याला लागणारे पार्ट याची विक्री केली जात होती. 2013 ते 2016 या

दरम्यान त्यांनी कार आणि त्याच्या पार्टची विक्री केली. त्या वरील व्हॅट त्यांनी ग्राहकांकडून घेतला. त्याची रक्कम पाच कोटी 78 लाख 91 हजार रुपये होती. हा कर भरण्याबाबत राज्य कर उप आयुक्त कार्यालयाकडून त्यांना वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या. मात्र त्यांनी ही रक्कम भरली नाही. व्याजासह सुमारे दहा कोटी 82 लाख वीस हजार दोनशे सोळा रुपये एवढी रक्कम झाली. त्यांनी रक्कम न भरल्याने व रक्कम भरण्यास प्रतिसाद न दिल्याने तिघा संशयितांविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button