सांगली : नाराजीनाट्यानंतर जयंत पाटील यांनी बोलवली बैठक | पुढारी

सांगली : नाराजीनाट्यानंतर जयंत पाटील यांनी बोलवली बैठक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादीविरोधात तोफ डागून व्यक्त केलेल्या नाराजीची राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दखल घेतली आहे. दोन्ही काँग्रेसचे नेते, नगरसेवकांची शनिवारी दुपारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक बोलवली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते माजीमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांची शनिवारची वेळ निश्‍चित होईना झाल्याने शनिवारी बैठक होणार अथवा नाही, याबाबत काँग्रेसमध्ये साशंकता होती.

काँग्रेसचे नेते माजीमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मंगळवारी महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादीविरोधात अनेक तक्रारी केल्या. महापालिकेच्या सन 2018 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी केली हीच मोठी चूक झाली. आघाडी केल्याचा लाभ राष्ट्रवादीला झाला, पण काँग्रेसचे नुकसान झाले, असे सांगत काँग्रेस नगरसेवकांनी भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा जास्त असतानाही महापौरपद राष्ट्रवादीला दिले, पण महापालिकेच्या कारभारात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला विश्‍वासात घेतले जात नाही. केवळ राष्ट्रवादीची ताकद, राष्ट्रवादीचेच संघटन वाढेल, अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादीशी आघाडी नको, असा पवित्रा काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला होता. उर्वरित वर्षभरासाठी काँग्रेसला महापौरपद मिळावे, अशी मागणीही काँग्रेस नगरसेवकांनी केलेली आहे.

काँग्रेस नगरसेवकांच्या नाराजीची राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दखल घेतली आहे. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना चर्चेला बोलविणार असल्याचेही त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते डॉ. विश्‍वजीत कदम व आमच्यात काही मतभेद नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवकांची एकत्र बैठक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवकांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. दरम्यान काँग्रेसचे नेते व नगरसेवकांना बैठकीचे निमंत्रण देण्याची जबाबदारी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्यावर सोपविली होती.

काँग्रेसचे चारही नेते शनिवारी बैठकीला उपस्थित असणे महत्वाचे आहे. हे नेते असतील तर बैठक होईल. नेत्यांची उपस्थिती निश्‍चित झाल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांना शनिवारच्या बैठकीचे निमंत्रण दिले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी रात्रीपर्यंत काँग्रेसच्या नगरसेवकांना निरोप गेले नाहीत. त्यामुळे डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या उपस्थितीबाबत व एकूणच बैठकीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

महापौरपदाबाबत पवित्रा काय राहणार !

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक यांची बैठक शनिवारी दुपारी 12 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात बोलवली आहे. या बैठकीत काँग्रेसकडून कोणते मुद्दे उपस्थित होणार, याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसला महापौरपद देण्याच्या मागणीवर राष्ट्रवादीचा काय पवित्रा राहणार?, राज्यातील सत्तांतराच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत पुन्हा बहुमताची जुळणी शक्य होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button