सांगली : पलूस जिल्हा परिषद गटात दिग्गजांचे पत्ते कट

सांगली : पलूस जिल्हा परिषद गटात दिग्गजांचे पत्ते कट

पलूस : तुकाराम धायगुडे : पलूस तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचा गट प्रबळ आहेत. माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, भाजपचे पृथ्वीराज देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुणअण्णा लाड यांच्या नेतृत्त्वाखाली वाटचाल सुरू आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे कुंडल आणि अंकलखोप हे दोन गट सर्वसाधारण (खुले) झाल्याने याठिकाणी पुन्हा जोरदार लढती होणार आहेत. दुधोंडी व भिलवडी गटात आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.

कुंडल जिल्हा परिषद गटात गेल्यावेळी काँग्रेसचे नेते महेंद्र लाड व राष्ट्रवादीचे शरद लाड यांच्यामध्ये लढत झाली होती. पुन्हा कुंडल गट खुला झाला आहे. या गटात प्रशांत पवार, ऋषिकेश लाड, भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. दुधोंडी, भिलवडी, सावंतपूर गटात सर्वसाधारण आरक्षण पडेल, अशी इच्छुकांना आशा होती. मात्र आरक्षण वेगळेच पडल्याने आता इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. या गटात काँग्रेसकडून मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव यांच्या पत्नी निर्मलाताई जाधव, शिवाजीराजे जाधव यांच्या पत्नी वर्षा जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. माजी जि.प. सदस्या अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

सावंतपूर जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. येथे भाजपकडून कै. आर. एम. आण्णा पाटील यांच्या स्नुषा सुनीता सुरेश पाटील अथवा भावजय बालिका आकाराम पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून अनिता कोरे, प्रतीक्षा पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून सरस्वती सूर्यवंशी, वाहिदा मुल्ला यांची नावे चर्चेत आहेत. अंकलखोप जि. प. गट सर्वसाधारण (खुले) झाले आहे. 2017 ला भाजपचे नितीन नवले यांनी विजय मिळविला. परंतु नवले यांनी आमदार अरूण लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून ते प्रबळ दावेदार मानले जातात. भाजपामधून डॉ. जयवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून ए. के. चौगुले, बाळासो मगदूम यांच्या नावाची चर्चा आहे.

भिलवडी जि.प. गटात भाजपचे सुरेंद्र वाळवेकर विजय झाले होते. आता हा गट सर्वसाधारण महिला पडल्याने या ठिकाणी अनेक इच्छुकांच्या दांड्या उडाल्या आहेत. काँग्रेसचे संग्राम पाटील, शहाजी गुरव, बाळू मोहिते, भाजपचे सुरेंद्र वाळवेकर, रमेश पाटील व राष्ट्रवादीकडून अजून उमेदवार निश्चित दिसत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news