जत : आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना फटका | पुढारी

जत : आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना फटका

जत ; विजय रुपनूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या तालुक्यातील नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी, मिनी मंत्रालयात प्रवेशासाठी गुडघ्याला बांशिग बांधले होते. परंतु आरक्षण पडल्याने त्यांची कोंडी झाली आहे. तालुक्यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, विक्रम ढोणे समर्थक अशा लढती होणार आहेत.

पुनर्रचनेनंतर जिल्हा परिषदचे दहा गट झाले असून पंचायत समितीचे 20 गण झाले आहेत. जिल्हा परिषद शेगाव गट अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या गटातून भाजपच्या आवंढीच्या माजी सरपंच श्रद्धा तानाजी गेजगे इच्छुक आहेत. शेगाव पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. अद्याप या ठिकाणी कोणीही दावा केला नाही. बनाळी पंचायत समिती गण सर्वसाधारण जागेसाठी खुला असल्याने येथे भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, युवा नेते मिलिंद पाटील, तसेच राष्ट्रवादीमधून जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश जमदाडे यांचे पुतणे अभय जमदाडे, निगडी खुर्द सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, पुनर्रचनेत नव्याने जिल्हा परिषद वाळेखिंडी गट झाल्याने या ठिकाणी इच्छुकांची गर्दी झाली आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी निवडणूक लढवावी, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. भाजपमधून प्रभाकर जाधव, काँग्रेसमधून नाथा पाटील, महादेव हिंगमिरे अपक्ष तर रासपचे माजी जिल्हाध्यक्ष मारूती सरगर लढणार आहेत.

सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी डफळापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी भाजपकडून लोकमाता अहिल्यामाता पतसंस्थेच्या अध्यक्षा लता वगरे यांचे नाव पुढे येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीमधूनही इच्छुकांची संख्या जास्त आहे. बाज पंचायत समिती गणातून शंकरराव वगरे व माजी सभापती आकाराम मासाळ यांच्या उमेदवारीचा भाजपकडून विचार केला जाऊ शकतो. काँग्रेसकडून अरविंद गडदे इच्छुक आहेत. तसेच भाजपाकडून अ‍ॅड. नानासाहेब गडदे यांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

जाडरबोबलाद जिल्हा परिषद गट हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने या ठिकाणी माजी शिक्षण सभापती तमन्नगोंडा रवी-पाटील यांचा भाजपकडून विचार केला जाऊ शकतो. माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ हाक्के यांच्या नावाची चर्चा आहे. प्रा. पांडुरंग वाघमोडे यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. माडग्याळ पंचायत समिती गणातून महिला ओबीसी आरक्षण असल्याने पंचायत समिती माजी सदस्या महादेवी हाक्के यांना उमेदवारी मिळू शकते. दरीबडची पंचायत समिती गणातून काँग्रेसचे युवा नेते गणी मुल्ला यांच्या पत्नी आपरीन मुल्ला यांचे नाव आघाडीवर आहे. माजी सभापती संजयकुमार सावंत, सचिन मदने, प्रवीण आवरादी यांनी अद्याप भूमिका जाहीर केली नाही.

गतवेळी दरीबडचीमधून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, उमदीतून चन्नाप्पा होर्तीकर, करजगी पंचायत समिती गणातून संग्राम जगताप, शेगाव जिल्हा परिषद गटातून प्रकाश जमदाडे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार, डफळापूरमधून दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण, राष्ट्रवादीचे मन्सूर खतीब यांना आरक्षणामुळे पर्यायाने दुसर्‍या गटात चाचपणी करावी लागणार आहे.

Back to top button