सांगली : पलूस पंचायत समितीत महिलाराज; १० गणांपैकी ५ ठिकाणी महिलांना आरक्षण | पुढारी

सांगली : पलूस पंचायत समितीत महिलाराज; १० गणांपैकी ५ ठिकाणी महिलांना आरक्षण

पलूस; पुढारी वृत्तसेवा : पलूस पंचायत समितीच्या एकूण १० गणांसाठी आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २ आणि खुल्या गटासाठी ७ जागा आरक्षित झाल्या आहेत. एकुण दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने पंचायसमितीमध्ये महिलाराज असणार आहे. आज तहसील कार्यालयात प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.

१ लाख ३८ हजार ७५८ लोकसंख्या असलेल्या पलूस तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ५ गट येतात. तर पंचायत समितीसाठी १० गण येतात. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ अशा गेल्या चार निवडणूकांचे आरक्षण गृहित धरून चक्रानुक्रमे आरक्षण काढण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले. सुरुवातीस अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तालुक्यात पंचायत समितीच्या १० गणात २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या काढण्यात आली. २००२ ते २०२२ पर्यंत नागठाणे, सावंतपूर, भिलवडी, बांबवडे हे चार गण अनुसूचितसाठी राखीव पडले होते. त्यामुळे उर्वरित सहा गणात जास्त लोकसंख्या असलेले कुंडल हे गाव असल्याने येथे अनुसूचित जाती हे आरक्षण जाहीर झाले.

सर्वसाधारण स्त्री आरक्षण मागील चार वर्षाच्या प्राधान्य क्रमांकाने काढण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक वसगडे, द्वितीय क्रमांक भिलवडी, तृतीय क्रमांक रामानंदनगर, चतुर्थ क्रमांक तुपारी या क्रमाने चार गण सर्वसाधारण स्त्री आरक्षित करण्यात आले. २७ टक्के नागरिक मागास प्रवर्गासाठी गेल्या चार निवडणूकांचे आरक्षण गृहित धरून अंकलखोप व सावंतपूर हे दोन गण आरक्षित करण्यात आले. तर उर्वरित नागठाणे, दुधोंडी, बांबवडे हे तीन गण सर्वसाधारण साठी सोडण्यात आले. काही ठिकाणी इच्छुकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी खुल्या आरक्षणाने इच्छुकांच्यातील स्पर्धा वाढणार आहे. अनेक इच्छुकांचा स्त्री आरक्षण पडल्याने चांगलाच हिरमोड झाला आहे. एकंदरीत दहापैकी पाच ठिकाणी महिलांना आरक्षण असल्याने राजकीय पुढाऱ्यांना आता सक्षम उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

पलूस पंचायत समिती आरक्षण गण पुढीलप्रमाणे :

  • तुपारी – सर्व साधारण स्त्री
  • कुंडल – अनु-जाती
  • बांबवडे – सर्व साधारण
  • सावंतपूर – ना.मा.प्र.स्त्री
  • दुधोंडी – सर्व साधारण
  • रामानंदनगर – सर्व साधारण स्त्री
  • नागठाणे – सर्व साधारण
  • अंकलखोप – ना.मा.प्र.
  • भिलवडी – सर्व साधारण स्त्री
  • वसगडे – सर्व साधारण स्त्री

Back to top button