कृष्णा नदीत हजारो मासे मृत | पुढारी

कृष्णा नदीत हजारो मासे मृत

कसबे डिग्रज : पुढारी वृत्तसेवा

आठवड्यापासून कृष्णा नदीत रसायनयुक्‍त पाणी मिश्रित झाल्याने हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. नदीला वाढलेले पाणी आणि पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन कारखान्यांनी रसायनयुक्‍त पाणी सोडल्याने मासे व अन्य जलचर जीव मृत झाले. नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे.

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सांगितले. याबाबत त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई, कोल्हापूर, सांगली, जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे संबंधित कारखान्यावर कार्यवाहीबाबत लेखी तक्रार केली आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जाते. अशा घटना वारंवार घडत असतात. यावर नियंत्रण राखण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार व जल कायद्याअंतर्गत संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी, असे फराटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button