सांगली : कृष्णा, वारणा काठाला पुराचा धोका | पुढारी

सांगली : कृष्णा, वारणा काठाला पुराचा धोका

सांगली : पुढारी वृत्तसेवा

धरण परिसरात व जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणे व नद्यांमध्ये पाण्याची मोठी आवक होत आहे. धरणे गतीने भरू लागली आहेत. कोयना, धोम, चांदोली धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी वाढू लागली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून प्रतिसेंकद विसर्ग एक लाख 25 हजार क्यूसेकपर्यंत वाढविला आहे.

कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्‍वर, चांदोली धरण भागात अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी आठपर्यंत कोयना येथे 123 मि.मी., तर मंगळवारी दिवसभरात 70 मि.मी. पाऊस पडला. महाबळेश्‍वर येथेही वरीलप्रमाणे अनुुक्रमे 136 व 137 मि.मी. पावसाची नोंद झाली. नवजाला 142 व 79 मि.मी. पाऊस कोसळला. धोम येथे 15 व 10, कण्हेरला 18 व 24 तर चांदोलीत 87 व 27 मिमी पाऊस पडला.

यामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयनात प्रतिसेंकद 50 हजार क्युसेक पाणी येत आहे. धोम, कण्हेरमध्ये पाच हजार तर चांदोलीत 21 हजार क्युसेक पाणी येत आहे. कोयना धरण सध्या 41 टीएमसी भरले आहे. आज या धरणातून 1050 विसर्ग सुरू केला आहे. धोम धरण 6.12 टीएमसी भरले आहे. कण्हेरमध्ये चार टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरण 21 टीएमसी भरले आहे. या धरणातून 829 क्युसेक पाणी प्रतिसेंकदाला वारणा नदीतसोडले जात आहे.

तसेच जिल्ह्यातही आज रिमझिम पाऊस पडला. शिराळा, वाळवा तालुक्यात मध्यम पाऊस पडत आहे. शिराळा तालुक्यात 34 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.8 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज 8 (129.2), जत 7 (117.8), खानापूर-विटा 4.7 (123.1), वाळवा-इस्लामपूर 18.3 (165.8), तासगाव 9.2 (113.3), शिराळा 34 (410.9), आटपाडी 2(83), कवठेमहांकाळ 6.9 (113.5), पलूस 12.8 (100.7), कडेगाव 7.5 (124.6). कोयना धरणातून सायंकाळी 1050 क्युसेक पाणी सोडले आहे. तसेच जिल्ह्यातील ओढे, नाल्यातून पावसाचे पाणी येत असल्याने नद्यांचे पाणी वाढू लागले

आहे. कृष्णा, वारणा, मोरणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या पाणी इशारा पातळीकडे जात आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फुटामध्ये पुढीलप्रमाणे : कृष्णा पूल (कराड) -11.10 (45), भिलवडी – 19.9 ( अंकली पूल (हरिपूर)- 21.9 (45.11), राजापूर बंधारा -35 (58). अनेक बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे.

पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवेत गारवा असल्याने लोक थंडीने गारठू लागले आहेत. कोयनातून सोडलेले पाणी गुरुवार सायंकाळ व शुक्रवारी सांगली जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकाठच्यागावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.दरम्यान, महापुरास कारणीभूत ठरणारे कर्नाटकातील अलमट्टी धरण 88.502 टीएमसी भरले आहे. या धरणात महाराष्ट्रातून एक लाख चार हजार पाणी सोडले जात आहे. तर या धरणातून पुढे एक लाख 25 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

Back to top button