मिरज : पुढारी वृत्तसेवा
वातावरणात बदल झाल्यामुळे मिरज शहरात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे लहान मुले असल्याचे निदर्शनास आले आहे. डेंग्यू, हिवताप होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे शहरात अनेकांना ताप येऊ लागला आहे. तापाचे रुग्ण वाढल्याने खासगी रुग्णालयासह महापालिका दवाखाना व शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणार्यांची गर्दी दिसत आहे. यामध्ये टायफाईडचेही रुग्ण आढळून येत आहेत. काही बालके हे एक-दोन दिवसांत उपचार घेऊन बरे होत आहेत.
याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे म्हणाले, हवामानामध्ये बदल झाला की अशी साथ येते. नागरिकांनी स्वतःची व आपल्या घरातील बालकांची काळजी घ्यावी. गेल्या महिन्याभरापासून मिरज शहरामध्ये सुमारे 100 हून अधिक आरोग्य कर्मचारी घरोघरी फिरून सर्वेक्षण करून नागरिकांना माहिती देत आहेत.
पावसाच्या कालावधीमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढते. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण सापडू नयेत, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे. डेंग्यू हा साचलेल्या पाण्यातून तयार झालेल्या एडीस इजिप्ती या डासापासून होतो. असे डास तयार होऊ नयेत, यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून माहिती दिली जात आहे. लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना थोडा जरी ताप आला तरी महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. घराजवळ पावसाचे किंवा अन्य पाणी साठू नये, याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.