सांगली जिल्ह्यात सातत्याने कारवाई तरीही बोगस बियाणे, खत विक्री | पुढारी

सांगली जिल्ह्यात सातत्याने कारवाई तरीही बोगस बियाणे, खत विक्री

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी विभागाकडून तीन महिन्यांपासून खते, बियाणे, कीटकनाशके तपासण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. विभागाच्या 11 भरारी पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यात सदोष 30 लाखांचे बियाणे आणि खते जप्त केली आहेत. तपासणीत 330 नमुने दोषी आढळले असून, त्यातील 35 जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेले आहेत. कारवाईचा धडाका सुरू असूनही बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री सुरू आहे.

जिल्ह्यात खरिपासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची खरेदी होते. काही उत्पादक कंपन्या आणि विक्रेते शेतकर्‍यांची फसवणूक करतात. पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत तपासणी करण्यासाठी 11 भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात 2 हजार 339 बियाणे विक्रेते, 2 हजार 984 खत विक्रेते आणि 2 हजार 488 कीटकनाशके विक्रेते आहेत. तपासणी पथकाने तीन महिन्यांत 2 हजार 223 बियाणे दुकानदार, 2 हजार 802 खते दुकानदार आणि 2 हजार 298 कीटकनाशके दुकानदार यांच्याकडे तपासणी केली. त्यात संशयास्पद आढळल्याने 230 बियाण्यांचे, 139 खतांचे तर 122 कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणी केलेल्या नमुन्यात पंधरा बियाण्यांचे, अठरा खतांचे तर दोन कीटकनाशकांचे नमुने दोषी आढळलेले आहेत.

दोषी बियाणे आढळल्याने एकशे पाच क्विंटल जप्त करण्यात आले. त्याची किंमत 23 लाख 53 हजार रुपये होते. सधन समजल्या जाणार्‍या वाळवा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. त्याशिवाय 40 क्विंटल बोगस खते जप्त करून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मणेराजुरी येथेही कारवाई करण्यात आली. या दोन उत्पादक कंपन्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या तीन महिन्यांत 70 बियाणे विक्रेत्यांवर, 121 खत विक्रेत्यांवर आणि 17 कीटकनाशके विक्रेत्यांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेले आहेत.

कृषी विभागाकडून कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. मात्र, त्यातूनही शेतकर्‍यांची फसवणूक करून लूट सुरूच आहे. फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

देशी बियाण्यांचा वाण मोडीत

पूर्वी बहुतेक शेतकर्‍यांच्याकडे देशी बियाण्यांचे वाण पेरणीसाठी राखेत ठेवले जायचे. त्याला फारशी कीड लागत नव्हती. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च येत नव्हता. त्याशिवाय बियाण्याचा खर्च वाचत होता. मात्र, गेल्या काही वषार्ंत जास्त उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी संकरित बियाणे पेरणीसाठी खरेदी करतो. बियाण्यांच्या किमतीही जास्त आहेत. त्याशिवाय पेरणी केल्यानंतर औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे.

उधारीमुळे विक्री जोमात

अनेक शेतकर्‍यांच्याकडे पेरणीच्या वेळी बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नसतात. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांकडून ते उधारीवर घेतात. पिकावर फवारण्यात येणारी विविध औषधेही मोठ्या प्रमाणात उधारीवर देण्यात येतात. अनेक विक्रेत्यांचा जास्त नफा मिळणारी बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीवर भर असतो. मात्र गुणवत्ता नसते. त्यातून शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे.

Back to top button