

जत : पुढारी वृत्तसेवा
बेळोंडगी (ता. जत) येथे सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साताप्पा अंबाजी बनसोडे (वय 35, रा. लोणीखेड, ता. इंडी, जि. विजयपूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सासू, सासरे, मेव्हुणे, साडू यांच्यासह सहाजणांवर उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मृत साताप्पा यांचा भाऊ शिवयोगी बनसोडे यांनी फिर्याद उमदी पोलिसात दिली आहे. सुरेश कांबळे, जय्याका सुरेश कांबळे, सुनील सुरेश कांबळे, प्रशांत सुरेश कांबळे, मंगलाबाई अजय सर्जे, अजय अण्णाप्पा सर्जे सर्व (रा. बेंळोडगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, साताप्पा बनसोडे यांचे काही वर्षांपूर्वी जत तालुक्यातील बेळोंडगी येथील मुलीशी विवाह झाला होता. ते काही दिवसांपूर्वी सासरवाडीला आले होते. त्यांचा दीड वर्षापासून पत्नी व सासरच्या लोकांशी वाद सुरू होता. मृत साताप्पा हे चार जून रोजी बेपत्ता झाले होते. याबाबतची नोंद उमदी पोलिसात झाली होती. दरम्यान, बोर नदीपात्रात शनिवारी सकाळी झाडास साताप्पा यांनी गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसपाटील वैशाली पुजारी यांनी याबाबतची माहिती पोलिसात दिली होती. साताप्पाचे भाऊ शिवयोगी यांनी उमदी पोलिसात सासरच्यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद दिली.