

इस्लामपूर : मारुती पाटील
पालिका निवडणुकीत इस्लामपुरात यावेळीही राष्ट्रवादी विरुद्ध विकास आघाडी असा दुरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र, निवडणुकीची रणनीती आखताना, उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींची दमछाक होणार आहे. गत निवडणुकीत विकास आघाडीचे निशिकांत पाटील थेट जनतेतून नगराध्यक्ष झाले होते. तर 28 पैकी विकास आघाडीला 13, राष्ट्रवादीला 14 जागा मिळाल्या होत्या. दादासो पाटील अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यांनी पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले होते.
या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजप, शिवसेना, काँग्रेस व मनसेची विकास आघाडी होणार आहे. मात्र, यापूर्वी आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेणार्या ज्येष्ठ नेत्यांची आघाडीत पोकळी निर्माण झाली आहे.वनश्री नानासाहेब महाडिक यांचे निधन झाल्याने तसेच माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तसेच माजी खासदार राजू शेट्टी हेही विकास आघाडीपासून दूर गेल्याने आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी कोण पुढाकार घेणार, हा आघाडीसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांना मतभेद विसरून जुळवाजुळवीसाठी पुढाकार घ्यावा लागेल. राज्यात आता भाजप व शिंदे गटाची सत्ता आल्याने विकास आघाडीला बळ आले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते या निवडणुकीत भाजपच्या गटांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.
तिकडे राष्ट्रवादीतही माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर शहरात पक्षाला एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाणार हे निश्चित आहे. पालिकेची हातातून गेलेली सत्ता पुन्हा परत मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ते स्वत: शहरात तळ ठोकून निवडणुकीची सुत्रे हलवतील अशी चर्चा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध विकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होण्याचे संकेत आहेत.
60 हजार मतदार…
शहराची लोकसंख्या 67 हजार 391 तर मतदारसंख्या 60 हजार 472 एवढी आहे. यामध्ये पुरुष मतदार 30 हजार 507, स्त्री मतदार 29963 आहेत. यावर्षी प्रथमच 2 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 8279 एवढी आहे.