सांगली : लढणार कार्यकर्ते : रसद राहणार नेत्यांची, मैदान पालिकांचे; जुळणी विधानसभेची! | पुढारी

सांगली : लढणार कार्यकर्ते : रसद राहणार नेत्यांची, मैदान पालिकांचे; जुळणी विधानसभेची!

सांगली : विवेक दाभोळे

जिल्ह्यातील उरूण – इस्लामपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या शहरांतील राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. पाचही ठिकाणी जरी कार्यकर्ते लढणार असले तरी त्यांना नेत्यांकडूनच मदत मिळणार हे स्पष्टच आहे. पालिकांचे मैदान पण ‘जुळणी’ विधानसभेसाठीची असेच या निवडणुकीचे स्वरूप राहील.

हॉट झोन ठरतेय इस्लामपूर….!

जिल्ह्यात एक चुरशीची लढत उरूण-इस्लामपूर नगरपालिकेसाठी होणार हे निश्‍चित आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समर्थकांना येथे विरोधकांशी जोरदार सामना करावा लागणार आहे. येथे राज्याची हातातून गेलेली सत्ता, सत्तेचे नसलेले ‘कव्हर’ हा राष्ट्रवादीसाठी ‘मायनस’ पॉईंट ठरू शकतो. सत्तांतरामुळे भाजप, रयत क्रांती संघटना यांच्यात उत्साह आहे. भाजपचे राहुल महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील, विकास आघाडीचे नेते विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार हे एकीचा पॅटर्न राबविणार का, याची उत्कंठा आहे. येथे राष्ट्रवादीचे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या कौशल्याची चुणूक दिसणार आहे.

आष्ट्यात दुरंगीपासून तिरंगी!

आष्टा शहरात 27 वर्षांपासून दिवगंत माजी आमदार विलासराव शिंदे आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात ‘अंडरस्टँडिंग’ होते. मात्र, यातून संधी मिळत नसल्याने जयंत पाटील समर्थकांतील असंतोष जयंत पाटील कसा ‘कंट्रोल’ करतात याकडे लोकांचे लक्ष आहे. राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे हे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, माजी गटनेते विशाल शिंदे यांच्या जोडीने कशी लढत देतात, याची उत्सुकता आहे.

तासगावात दिग्गज आमनेसामने

तासगावात सत्ता कायम राखणे हे खासदार संजय पाटील यांच्यापुढे आव्हान आहे. सत्ता असूनही पाटील यांच्याकडून भरीव काम झाले नाही याकडे बोट दाखवित विरोधकांची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांना येथे राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देणे हे आव्हान ठरणार आहे.

विट्यात रंगणार काटा लढत

विटा शहरात महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गोटात जोश होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात आमदार अनिलभाऊ बाबर डेरेदाखल झाले. यातून बाबर गटाला मोठी ऊर्जा मिळणार आहे. येथे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सदाभाऊ पाटील यांनी ‘मिशन आमदारकी’ राबवून तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सदाभाऊ पाटील, युवा नेते वैभव पाटील यांना ताकद दिली आहे. येथील निकालाचे प्रतिबिंब विधानसभेसाठी परिणामकारक ठरणार आहे.

पलूसमध्ये नेत्यांची ताकद

दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासाठी पर्यायाने काँग्रेससाठी बालेकिल्ला राहिलेल्या पलूस – कडेगावमधील पलूस पालिकेची निवडणूक पुन्हा स्थानिक आघाड्यांमध्येच रंगेल. समर्थकांच्या आघाड्यांना माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची ताकद राहणार आहे. राज्यातील सत्तांतराचे या ठिकाणी चांगलेच पडसाद उमटतील.

Back to top button