सांगली : धरणात पाणीसाठा वाढू लागला; कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ | पुढारी

सांगली : धरणात पाणीसाठा वाढू लागला; कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी आणि कोयना, चांदोली, धोम, कण्हेर, नवजा, महाबळेश्‍वर या परिसरात पाऊस सुरूच आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढत आहे. गेल्या चार दिवसात कोयनेत 10 तर चांदोली धरणात 4 टीएमसीने पाणी साठा वाढला आहे. कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळीही वाढू लागली आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. मात्र जिल्ह्यात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 10.4 मिमी पाऊस पडला.

जिल्ह्यात सकाळी 8 पर्यंत 24 तासात सरासरी 2.2 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मागील 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज 2.1 : (100.4), जत : 0.3 (97.2), खानापूर-विटा : 0.6 (92.9), वाळवा-इस्लामपूर : 2.1 (101), तासगाव : 1.4 (81.9), शिराळा : 10.4 (261.6), आटपाडी : 0.1 (70.6), कवठेमहांकाळ : 2.1 (85.5), पलूस : 2.1 (62.8), कडेगाव :0.5 (80.8). जिल्ह्यात जूनपासून जत, खानापूर, शिराळा, वाळवा या तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे. तुलनेत इतर तालुक्यात कमी पाऊस आहे.

पाणीसाठा

दरम्यान धरण परिसरात पाऊस सुरुच आहे. कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 103 तर गुरुवारी दिवसभर म्हणजे सायंकाळी पाच वाजेपर्यंत 47 मिमी पाऊस पडला.

महाबळेश्‍वर येथे वरीलप्रमाणे अनुक्रमे 121 व 75 मिमी पाऊस झाला. नवजाला वरीलप्रमाणे 122 व 50 मिमी पाऊस पडला. गेल्या चार दिवसापासून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. कोयनेतील पाणीसाठा 23.04 टीएमसी झाला आहे. धोमला 29 व कण्हेरला 15 मिमी पाऊस पडला. धोम धरणात 4.39(13.50), कण्हेरमध्ये 2.61 (10.10) पाणीसाठा झाला आहे.

सध्या चांदोलीतून 710 आणि कण्हेरमधून 24 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. अलमट्टी धरणात 63.84 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Back to top button