‘त्या’ विषारी गोळ्यांचा होतो गलाई व्यवसायात वापर | पुढारी

‘त्या’ विषारी गोळ्यांचा होतो गलाई व्यवसायात वापर

मिरज : पुढारी वृत्तसेवा

म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबियांचे हत्याकांड करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विषारी गोळ्या या गलाई व्यवसायामध्ये वापरण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु या गोळ्यांचा वापर मांत्रिक आब्बास बागवान आणि गोळ्या पुरविणारा मनोज शिरसागर यांनी हत्याकांडासाठी केला असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याकांडाचा तपास करताना पोलिस आता गलई व्यवसायापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. गलाई व्यवसायासाठी लागणारे हातोडी व छिन्नी तयार करणारे शहा अँड कंपनीचे शहा, गलाई व्यवसाय करणारा लक्ष्मीकांत हजरा आणि जुने नाणी व नोटा विक्रीचा व्यवसाय करणारा अशपाक मुन्शी या पुण्यातील तिघांच्या मार्फत साखळी पद्धतीने विषारी गोळ्या मिळवून मनोज शिरसागर याने मांत्रिक बागवान याला दिल्या होत्या.

त्या विषारी गोळ्यांच्या माध्यमातून विषप्रयोग करून मांत्रिक बागवान याने हे हत्याकांड घडवून आणले होते. विषारी गोळ्या बनविणारी कंपनी आणि त्याचा पुरवठादार यांचा शोध पोलिस घेत आहेत. सोने पॉलिश करण्यासाठी एक विशिष्ठ रासायनिक मात्रा असलेल्या अशा गोळ्यांचा वापर गलाई व्यावसायिक करतात. परंतु या रसायनाची अधिक मात्रा असलेल्या गोळ्या शिरसागर याने तिघांकडून साखळी पद्धतीने मिळवल्या होत्या. याच गोळ्यांच्या माध्यमातून वनमोरे कुटुंबावर विष प्रयोग करून हे हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे. विषारी गोळ्याबाबत तपास सुरू असून त्याचे काही नमुने देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, मांत्रिक बागवान याचा या हत्याकांडातील साथीदार धीरज सुरवशे याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडे अजून गुन्ह्याबाबत तपास करण्यात येत असल्याने पोलिसांनी कोठडी वाढवून मागितली. त्यामुळे न्यायालयाने सोमवार, दि. 11 पर्यंत त्याच्या कोठडीत वाढ केली आहे.

सोलापुरातून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

मांत्रिक बागवान हा राहत असलेल्या त्याच्या बहिणीच्या घराची झडती घेण्यासाठी पोलिसांचे पथक बुधवारी सोलापूरला गेले होते. त्यावेळी मांत्रिकाच्या बहिणीच्या घराच्या परिसरात असणारे काही सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. त्या घरी कोणाकोणाचे येणे- जाणे होते, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, मांत्रिकाची बहीण अद्याप फरारी असून तिचा देखील शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button