दिंडीत टेम्पो शिरला; शाहूवाडीचे 17 वारकरी जखमी | पुढारी

दिंडीत टेम्पो शिरला; शाहूवाडीचे 17 वारकरी जखमी

नागज : पुढारी वृत्तसेवा ; सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडीजवळ भरधाव टेम्पोने वारकर्‍यांच्या रथाला जोरदार धडक दिली. तेथून हा टेम्पो थेट दिंडीत शिरल्याने झालेल्या अपघातात शिवारे कापशी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील 17 वारकरी जखमी झाले. यामध्ये सहा पुरुष व अकरा स्त्रियांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापशी येथील सद्गुरू संत बाळूमामा दिंडी सोहळ्यातील 130 वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरला निघाले होेते. मंगळवारी सायंकाळी लग्नाचे साहित्य घेऊन निघालेल्या पिकअप टेम्पोने (एम.एच. 08 डब्ल्यू 5771) दिंडीतील रथाला (एम.एच. 09 ईएम 6204) जोरात धडक दिली.

या धडकेत टेम्पो उलटून वारकर्‍यांच्या दिशेने घसरत गेला. त्यामुळे दिंडीतील वारकरी जखमी झाले. जखमी 17 वारकर्‍यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

जखमींची नावे : सुरेश शिवाजी पाटील (वय 55), सुशांत सर्जेराव पाटील (46), हौसाबाई नाईकवडी (70), जिजाबाई नारायण जाधव (50), बाळू श्रीपती पाटील (40), आक्काताई बाळासाहेब पाटील (55), आक्काताई अनिल कांबळे (50), आक्काताई आनंदा नाईकवडी (49), सुशीला शंकर फाळके (45), प्रकाश रामचंद्र जाधव (40), सुरेखा प्रकाश पाटील (50), सखुबाई शामराव पाटील, शंकर मारुती पाटील (40), सुमन रंगराव कदम (40), राजाराम बाळू पाटील (55), बाळाबाई पाटील (50) व आक्काताई पाटील.

Back to top button