सांगली: राजेवाडीत पती-पत्नीची गळफासाने आत्महत्या | पुढारी

सांगली: राजेवाडीत पती-पत्नीची गळफासाने आत्महत्या

आटपाडी/दिघंची: पुढारी वृत्तसेवाराजेवाडी (ता. आटपाडी) येथे दोन वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूने आलेल्या नैराश्यातून करण नाना हेगडे (वय 28) व शीतल करण हेगडे (22) या पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली आहे. राजेवाडी ग्रामपंचायत सदस्या विमल हेगडे यांचा करण हा मुलगा आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हेगडे दाम्पत्याला दोन वर्षांची एकच मुलगी होती. त्यांच्या लग्‍नाला सहा वर्षे झाली होती. या मुलीचा चार दिवसांपूर्वी गुलाबजाम खाताना तो घशात अडकल्याने मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूवेळी तिची झालेली तडफड पाहून हेगडे पतीपत्नी अत्यंत दुखी होते. ते दु:ख सहन न झाल्याने करण व शीतल यांनी गुरुवारी दुपारी कानिफनाथ मंदिर परिसरातील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. करण यांच्या पश्‍चात दोन भाऊ, आई असा परिवार आहे. करण हे पुणे येथे सिक्युरिटी एजन्सी चालवत होते. या घटनेने राजेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. याबाबतची माहिती राजेवाडीचे पोलिसपाटील यांनी आटपाडी पोलिसांना दिली.

मुलीच्या विरहाचा चिठ्ठीत उल्लेख

मृत पती- पत्नीजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये मुलीच्या विरहामुळे व्यथित होऊन आम्ही आत्महत्या करत असल्याच लिहिले आहे. आमच्या मृत्यूस आम्ही स्वतःजबाबदार असल्याचे त्यात म्हटले आहे. आटपाडी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Back to top button