सांगलीत ‘वाईन शॉप’मधील ‘तळीराम’ टार्गेट! | पुढारी

सांगलीत ‘वाईन शॉप’मधील ‘तळीराम’ टार्गेट!

सांगली; पुढारी वृत्तसेवा:‘वाईन शॉप’मधून दारूची बाटली खरेदी करीत असाल तर सावधान रहा…कारण साध्या वेशातील पोलिस तुमच्यावर कारवाई करण्यासाठी झडप मारण्यास तयार आहेत. ‘वाईन शॉप’मधून दारूची बाटली खरेदी करणारे तळीराम सध्या ‘टार्गेट’ बनले आहेत. दररोज चार-पाच जणांना पकडले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिसांनी अशाप्रकारच्या कारवाईचा सपाटाच लावला आहे.

‘वाईन शॉप’समोर पकडूनही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आला, अशाप्रकारे गुन्हा दाखल केला जात आहे. शहर आणि विश्रामबाग पोलिसांनी या कारवाईचा सपाटाच लावला आहे. मार्केट यार्ड व मुख्य बसस्थानकाजवळील वाईन शॉपजवळ कारवाई केली जात आहे. दारूची बाटली जवळ बाळगणे व दारू पिण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेणे आवश्यक असते. एक हजार रुपये शुल्क भरून एक वर्षाचा परवाना दिला जातो. परमिट रूम व बिअर बारमध्ये तर परवाना असेल तरच ग्राहकाला दारू अथवा बिअर द्यावी, असा नियम आहे. पण या नियमाचे पालन होताना दिसत नाही.

उत्पादन शुल्क विभाग वर्षातून एकदाच 31 डिसेंबरला सर्व देशी दारू दुकाने, वाईन शॉप व परमिट रूम बिअर बारमध्ये एक दिवसाचे परवाने देण्याचे सक्ती करतात. पाच रुपये शुल्क घेऊन हा परवाना दिला जातो. दारूची बाटली बाळगणे किंवा त्याचे सेवन करणे, याचा परवाना आहे का नाही, हे तपासण्याची जबाबदारी खरं तर उत्पादन शुल्क विभागाची आहे. मात्र त्यांचे हे काम सध्या पोलिस करीत आहेत.

शासनाने ‘आम्हालाही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत’, असे पोलिस सांगत आहेत. अंधार पडू लागला की, पोलिस साध्या वेशात वाईन शॉपसमोर जाऊन थांबतात. दारूची बाटली घेऊन खिशात घातलेली पाहिले की, लगेच त्याला पकडतात. माधवनगर (ता. मिरज) येथे एकाकडे प्लॉस्टिकचा ग्लास जवळ सापडला होता. त्यालाही पकडण्यात आले. दारूचे सेवन करण्याच्या उद्देशाने ग्लास घेऊन फिरताना आढळून आला, असे कलम लाऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दंड दोनशे रुपये…खर्च एक हजार रुपये!

दारूची बाटली सापडल्यानंतर पोलिस संबंधित तळीरामाला पोलिस ठाण्यात नेतात. त्याला नोटीस देऊन न्यायालयात हजर होण्यास सांगितले जाते. तिथे वकिलामार्फत हजर होतात. गुन्हा कबूल आहे का, असे न्यायालय विचारते. कबूल आहे म्हटल्यानंतर न्यायालय दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावते. या सर्व भानगडीत हजारभर रुपये खर्च येतो.

Back to top button