कासेगाव: विवाहितेची गळफासाने आत्महत्या | पुढारी

कासेगाव: विवाहितेची गळफासाने आत्महत्या

कासेगाव;पुढारी वृत्तसेवा: कासेगाव (ता. वाळवा) येथे पती वैभव मिसाळ याच्या जाचास कंटाळून पत्नी किरण वैभव मिसाळ (वय 25) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत किरण यांचा विवाह चार महिन्यांपूर्वी वैभव याच्याशी झाला होता. वैभव याचे किरण बरोबर हे तिसरे लग्न झाले होते. तर मयत किरणचे वैभव याच्याशी दुसरे लग्न होते. वैभवच्या पहिल्या पत्नीचे सहा महिन्यांपूर्वी कॅन्सर आजाराने निधन झाले होते.

कासेगाव येथे जोगण्या उत्सव यात्रा सुरू आहे. गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सायंकाळी यात्रेत जाण्यावरून मयत किरण व पती वैभव यांच्यात वाद झाला होता. वादानंतर किरण या घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कासेगाव-तांबवे रस्ता लगत असणार्‍या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी काही शेतकर्‍यांना झाडाला लटकलेला मृतदेह निदर्शनास आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, याप्रकरणी मयत किरणची आई संगीता प्रल्हाद वायदंडे (वय 40, मूळ रा. भाटवाडी, सध्या रा. शिरटे, ता. वाळवा) यांनी कासेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वैभव यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्या संबंधास माझी मुलगी किरण विरोध करीत होती. त्यामुळे वैभव हा सतत तिला मारहाण व शिवीगाळ करीत होता. त्या त्रासाला कंटाळून किरणने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button