सांगली: मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायदा लावा | पुढारी

सांगली: मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायदा लावा

सांगली: पुढारी वृत्तसेवा
म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबीयांचे हत्याकांड करणारा मांत्रिक आब्बास बागवान व त्याचा सहकारी धीरज सुरवशेवर जादूटोणाविरोधी कायदानुसार कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात आणि फारुख गवंडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

ते म्हणाले, जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत असलेली दक्षता अधिकारी ही तरतूद प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करण्याची गरज आहे. कायद्यामधील या तरतुदीनुसार प्रत्येक पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी हे दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत असतात. संबंधित स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाबा-बुवांच्या ठिकाणी जाऊन चौकशी करणे आणि गरज पडल्यास साहित्य जप्त करण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत. वनमोरे बंधू हे अनेक दिवस गुप्तधनाचा शोध घेत असल्याचे आजूबाजूच्या अनेक लोकांना माहीत होते. त्यासाठी त्यांनी अनेक सावकारांकडून कर्ज घेतले होते. यासारख्या प्रकरणांविषयी जागरूक नागरिकांनी वेळीच तक्रार केली असती आणि दक्षता अधिकार्‍यांनी त्यांची दखल घेतली असती तर अशा घटना टाळता येऊ शकतात.

त्यांनी पुढे सांगितले की, सध्या अनेक सुशिक्षित लोकदेखील अंधश्रद्धांना बळी पडत असल्याने ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’ याविषयी समाजात प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सधन कुटुंबातील व्यक्तीदेखील पैशांच्या हव्यासातून नोटा दामदुप्पट करणे, उल्कापातातून झालेल्या धातूचे यंत्र ‘नासा’ला विकून मालामाल होणे, पैशांचा पाऊस, गुप्तधन अशा हव्यासाला बळी पडताना दिसत आहेत. अशा प्रकारे कोणाचेही पैसे दामदुप्पट होऊ शकत नाहीत. अशा भूलथापांना लोकांनी बळी पडू नये. गुप्तधनाच्या दाव्यावर विश्वास ठेवणे आणि सातत्याने त्याच्या मागे धावणे, या पाठीमागे मानसिक अस्वस्थतेची लक्षणे असू शकतात. त्यामुळे गरज पडल्यास अशा व्यक्तीला बरे करण्यासाठी कुटुंबीयांनी मानसोपचारांची मदत घ्यावी, असे देखील डॉ. हमीद दाभोलकर यांनी यावेळी नमूद केले. यावेळी ‘अंनिस’चे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, प. रा. आर्डे,चंद्रकांत वंजाळे, स्वाती वंजाळे, आशा धनाले, त्रिशला शहा, हनुमंत सूर्यवंशी उपस्थित होत

Back to top button