

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : 'आरटीई' अंतर्गत 25 टक्के मोफत प्रवेशासाठी पाल्याचे घर ते शाळा हे अंतर कमी दाखवत अटीचे उल्लंघन करून प्रवेश मिळवल्याचा प्रकार स्थायी समितीपुढे आला. दरम्यान, 'आरटीई'तून महापालिका क्षेत्रात पहिलीच्या वर्गासाठी झालेल्या सर्वच प्रवेशांची तपासणी करून अहवाल सादर करावा, असा आदेश स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनी दिला.
महानगरपालिकेत शुक्रवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी निरंजन आवटी होते. सदस्य जगन्नाथ ठोकळे यांनी 'आरटीई'अंतर्गत 25 टक्के मोफत प्रवेशासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. आरटीई अंतर्गत मागासवर्गीय व दुर्बल घटकातील पाल्यांना विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीचे 25 टक्के प्रवेश मोफत दिले जातात. ठराविक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा कल अधिक असतो. त्यामुळे अशा शाळांकडे जादा संख्येने अर्ज येतात. लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जातात. 'एनआयसी'च्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाते.
दरम्यान, एखाद्या विनाअनुदानित शाळेत 'आरटीई'तून 25 टक्के मोफत प्रवेश या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित पाल्याचे घर हे संबंधित शाळेपासून एक किलोमीटर अंतरात असणे आवश्यक आहे. मात्र लांब अंतर असतानाही खोटी माहिती भरून एक किलोमीटर अंतरात घर असल्याचे दाखवत आरटीईतून प्रवेशासाठी अर्ज केला जात असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. एका शाळेत असा प्रकार घडल्याकडे लक्ष वेधले.
त्यामुळे 'आरटीई'तून झालेल्या प्रवेशांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, तपासणी करून अहवाल सादर करावा, असा आदेश स्थायी समिती सभापती आवटी यांनी दिला. महापालिका शाळांचे प्रश्न, उपलब्ध सुविधा, शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची कमतरता तसेच मॉडेल स्कूल, सेमी इंग्लिश शिक्षणासाठी निवडायच्या शाळेसंदर्भात जगन्नाथ ठोकळे, फिरोज पठाण, सविता मदने यांनी उपस्थित केला. यासंदर्भात स्थायी समिती सदस्यांबरोबर शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांची बैठक आयोजित करण्याचे निर्देश सभापती आवटी यांनी दिली.
मनपा शाळा नं. 1 ला स्कूल बस द्या : पद्मश्री पाटील
सदस्या पद्मश्री पाटील म्हणाल्या, महापालिकेच्या शाळा नंबर 19 ची विद्यार्थी संख्या 150 असताना त्यांना स्कूल बस उपलब्ध करून दिली आहे. महापालिका शाळा नंबर 1 ची विद्यार्थी संख्या 250 आहे. महापालिकेने या शाळेला स्कूल बस घेऊन द्यावी. बस फेरीच्या मार्गातील महापालिकेच्या अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांनाही या बसचा लाभ होईल.