सांगली प्रा. शिक्षक बँक निवडणुक : जुनी पेन्शनच्या स्वार्थी अध्यक्षांना धडा शिकवणार : गुणवंत विधाते | पुढारी

सांगली प्रा. शिक्षक बँक निवडणुक : जुनी पेन्शनच्या स्वार्थी अध्यक्षांना धडा शिकवणार : गुणवंत विधाते

सांगली; पुढारी वृत्तसेवा : एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देणार्‍यांनी, एकच मिशन शिक्षक बँक इलेक्शन हे स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू करून तमाम पेन्शन हक्क संघटन शिलेदारांचा अपमान केला असल्याचा आरोप जतमधील आघाडीचे पेन्शन फायटर शिलेदार गुणवंत विधाते यांनी केला.

शिक्षक बँक निवडणुकीत औदुंबर येथे 70 पेन्शन फायटरांसह पुरोगामी सेवा मंडळाला पाठिंबा त्यांनी जाहीर केला. ते म्हणाले, संघटन उभा करताना केवळ जुनी पेन्शन मिळविण्यासाठीच हे संघटन काम करेल, आम्ही कोणीही शिक्षक बँक निवडणूक लढणार नाही, असे धोरण असल्याचे सांगणार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो पेन्शन फायटरसमोर केलेली गर्जना हवेतच विरली आहे. स्वतःच गुडघ्याला बाशिंग बांधून शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहून संघटनेला वार्‍यावर सोडण्याचे काम जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे. त्यांना तीव्र विरोध करू. हे संघटन जिल्हाभर असताना स्वत:च्या तालुक्यात स्वार्थ साधण्यासाठी दोन जागांवर तडजोड करून दोन्ही जागा मिरजेत घेण्याचे कारण म्हणजे यांचा स्वार्थ हेच कारण स्पष्ट होते. केवळ भाषणबाजी करणे याशिवाय त्यांनी संघटनेच्या हिताला वार्‍यावर सोडण्याचे पाप केले आहे. यामुळे आमचे पेन्शन फायटर नक्कीच धडा शिकवतील. सुरुवातीपासूनच आम्ही संघटन उभा करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले, मात्र पेन्शनधारकांचा विश्वासघात केला आहे.

आप्पासाहेब सौदागर म्हणाले, जिल्ह्यात सर्वाधिक जुनी पेन्शन फायटर सभासद संख्या जतमध्ये आहे. मात्र केवळ 35 मतदार असलेल्या मिरजेत दोन्हीही उमेदवार तेदेखील सर्वसाधारण गटातून दिले आहेत. यांना बहुजनांचे वावडे आहे काय? विनायक शिंदे हे आजपर्यंत फक्त स्वतः निवडून येतात व सोबतचा उमेदवार पाडतात. अशाच प्रवृत्तीला बळ देण्याचे काम अमोल शिंदे यांनी केले आहे. जुनी पेन्शन मिळण्यासाठी सर्वच प्राथमिक शिक्षक संघटनांचे सहकार्य लाभले असताना एखाद्या संघटनेबरोबर जाणे म्हणजे संघटनेचे विघटन होण्याच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याची त्यांनी टीका केली.

Back to top button