सांगली : अवैध वाळू, माती वाहतूक; अडीच लाखांचा दंड | पुढारी

सांगली : अवैध वाळू, माती वाहतूक; अडीच लाखांचा दंड

पलूस; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अंकलखोप हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणार्‍या अशरफ सिकंदर मुजावर यांच्यावर कारवाई करुन त्यांचा टेम्पो व बलवडी फाटा परिसरामध्ये माती वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला आहे. या दोन्ही वाहनांना अडीच लाखाचा दंड केल्याची माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.

तहसीलदार ढाणे म्हणाले, तालुक्यामध्ये होत असलेल्या अनधिकृत गौणखनिज उत्खनन वाहतुकीवर आळा घालण्याच्यादृष्टीने मोठया प्रमाणावर दंडात्मक कारवाया करण्यात येत आहेत. याकामी मध्यरात्री नदी पात्रात व संभाव्य अवैध वाहतूक होणार्‍या ठिकाणांवर गस्त घालण्याकामी तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची पथके तयार केली आहेत. दि. 19 जूनरोजी पथकाने अंकलखोप हद्दीमध्ये अंदाजे अर्धा ब्रास अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेला (एम.एच.12डी.टी -2028) हा टेम्पो पकडला आहे. तर दुसरीकडे बलवडी फाटा परिसरामध्ये माती वाहतूक करणारा ट्रक (एम.एच-10- झेड -3712) हा पकडण्यात आला. सदरची दोन्ही वाहने पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. वाळू वाहतूक करणारा टेम्पो अशरफ सिकंदर मुजावर यांचा असून ट्रक मालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. या दोन्ही वाहनांतून होत असलेल्या अवैध वाहतुकीवर दंडात्मक कारवाई होणार असून यातून शासनास अंदाजे अडीच लाखांचा दंड वसूल होणार आहे.

प्रशासनाला जाग

पलूस तालुक्यात गौण खनिजाचे उत्खनन ; महसूल विभागाची डोळेझाक या आशयाची बातमी दै.‘पुढारी’मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत दि. 16 जूनरोजी ब्रह्मनाळ नदीपात्रात वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर लागोपाठ दि. 19 जूनरोजी अंकलखोप व बलवडी फाटा येथे वाळू व वाहतूक करणार्‍या वाहनावरती कारवाई झाल्याने दै. ‘पुढारी’मुळेच प्रशासनाला जाग आल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Back to top button