सांगली : शिक्षक बँकेवर विजयाची हॅट्ट्रिक होणार | पुढारी

सांगली : शिक्षक बँकेवर विजयाची हॅट्ट्रिक होणार

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यासह सोलापूर भागातून मोठ्या संख्येने शिक्षकांचा पाठिंबा मिळत आहे. यावेळी आमचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, या वेळीही आम्ही विजयाची हॅट्ट्रिक साधणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते विश्‍वनाथ मिरजकर यांनी केले.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक समिती, शिक्षक भारती, शिक्षक संघटना, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ पुरस्कृत पुरोगामी सेवा मंडळ पॅनेलचा प्रचार शुभारंभ औदुंबर येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल कादेे होते.

मिरजकर म्हणाले, आमच्या सत्तेच्या काळात संचालक मंडळाने स्वच्छ व पारदर्शी कारभार केला आहे. त्यामुळे बँक सक्षम आहे. आपण अध्यक्ष असताना ठेव जमा करण्यास सुरुवात केली. आज साडे पाचशे कोटी रुपयांवर ठेवी आहेत. आपली कौटुंबिक आर्थिक स्थिती चांगली आहे. आपले वेतन, पेन्शन सुद्धा चळवळीसाठी खर्च करीत आहे. शिक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपला लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील. अनेक संघटना आपल्या पाठीमागे येणार आहेत.

समितीचे राज्य उपाध्यक्ष उदय शिंदे म्हणाले, बारा वर्षे शिक्षक समितीची सत्ता बँकेत आहे. सभासद हित डोळ्यासमोर ठेवून काम करणारी ही बँक आहे. हा आदर्श विश्वनाथ मिरजकर यांच्या विचारांचा आहे. सभासदांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

बँकेचे अध्यक्ष यू. टी. जाधव म्हणाले, विरोधकांकडे सोशल मीडिया सोडून दुसरे काहीच नाही. कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा विक्रम पुरोगामी सेवा मंडळाने केला आहे. सुनीता चौगुले, एस. आर. पाटील, राजेंद्र कोरे, पप्पू मुलाणी आदींनी मनोगत व्यक्त केले.

विकास चौगुले, आप्पासाहेब दळवी यांचा सत्कार करण्यात आला. किरण गायकवाड यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष शशिकांत भागवत, सयाजीराव पाटील, राजेंद्र कांबळे, शंकर टकले, बाजीराव सावंत, राजेंद्र चौगुले, लक्ष्मण सरगर, हनुमंत मंगसुळे, अमोल साळुंखे आदी उपस्थित होते.

Back to top button