शिराळा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

शिराळा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत

कासेगाव पुढारी वृत्तसेवा :  शिराळा डोंगरी विभागात मान्सूनने हुलकावणी दिल्याने, धूळवाफ पेरणी केलेल्या क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी चिंतातूर बनला आहे. तालुक्यात 70 ते 75 टक्के पेरणी झाली आहेत. मान्सूनच्या आगमनाची शेतकरी वाट पाहत आहेत.

शिराळा पश्चिम, उत्तर व दक्षिण भागातील डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात भातासह अन्य पिकांची पेरणी मे महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात कोरड्या मातीतच धूळवाफ पेरणी केली आहे. उर्वरित भुईमूग, सोयाबीन, नाचणी, मका, ज्वारी, बाजरीची पेरणी खोळंबली आहे. पाऊस नसल्याने तालुक्यात धूळवाफेवर भातपेरणी केलेल्या शेतामध्ये नदीकाठच्या भागात ठिकाणी काही ठिकाणी विद्युत पंपाद्वारे पाणी पाजले जाते. काही ठिकाणी विद्युत पंपाद्वारे पाणी पाजले जात आहे. तर काही ठिकाणी अर्धवट ओलीवर उगवण झालेले भातपीक कोमेजू लागले आहे.

शिराळा पश्चिम विभाग हे पावसाचे आगर असल्याने एकदा पाऊस सुरू झाला तर भात खाचरात पाणी साचते. त्यामुळे या क्षेत्रात पेरणी करण्यास घात येत नसल्याने शेत पडून राहते. त्यामुळे कोरड्या मातीत शेतकरी पेरणी करतो व मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाला की पिके उगवून येतात.

दरवर्षीप्रमाणे शेतकर्‍याने मे महिन्याच्या अखेरीस डोंगरी शेतीची मशागत आटोपून रोहिणी नक्षत्रावर पेरणी करत रोहिणीचा फेरा गाठला. खरी धूळवाफ पेरणी केली. त्यातच अवकाळी व वादळी काही प्रमाणात पाऊस झाल्याने धूळवाफ पेरणी केलेल्या क्षेत्रावर तुरळक प्रमाणात उगवण झाली. पण तीन आठवडे उलटले तरी विभागात कडक ऊन पडू लागले आहे, त्यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. अनेक ठिकाणी पावसाच्या कमी-जास्त प्रमाणामुळे पिकांची म्हणावी अशी उगवण झाली नाही. त्याचा परिणाम झाल्याने धूळवाफ पेरणी केलेले शेती क्षेत्र मोकळे दिसत आहे. त्यातच पावसाने हुलकावणी दिल्याने उगवण झालेल्या क्षेत्रावरील पिके कोमेजू लागली आहेत.

पंचाहत्तर टक्के पेरणी पूर्ण : शेतकरी चिंतातूर : उर्वरित कामे ठप्प

मशागतीची कामेही खोळंबली…

विभागातील शेतकरी जूनमध्ये धूळवाफ पेरणी केलेल्या पिकांमध्ये आंतरमशागत करतो, पण पाऊस नसल्याने ही कामेही खोळंबली आहेत. आंतरमशागतीच्या कामामुळे मातीतील ओलावा कमी होऊन पिके वाळून जातील, अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. मान्सून लांबल्याने शिराळा तालुक्यातील शेतकरी चिंतातूर बनला आहे.

हेही वाचा

Back to top button