सांगली : वेटरचा गळा चिरून खून | पुढारी

सांगली : वेटरचा गळा चिरून खून

तासगाव : पुढारी वृत्तसेवा
तासगाव-विटा रस्त्यावरील वंजारवाडी हद्दीतील दोस्ती ढाब्यावर एका वेटरने दुसर्‍या वेटरचा चाकूने गळा चिरून खून केला. हणमंत श्रीरंग पिसाळ (रा. बावधन, ता. वाई) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. याप्रकरणी सुशांत बजरंग जगताप (रा. बस्तवडे, ता. तासगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी ढाबामालक श्रीकांत दत्तात्रय खोत (वय 22, रा. वंजारवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव-विटा रस्त्यावर वंजारवाडी हद्दीत दोस्ती ढाबा आहे. शुक्रवारी संकष्टी असल्यामुळे ढाब्याला सुट्टी होती. त्यामुळे सर्व कामगारांनाही सुट्टी होती. हणमंत आणि संशयित सुशांत हे सुटी असल्याने तासगावात दिवसभर दारूच्या नशेत फिरत होते, अशी माहिती समोर येत आहे.

दारूच्या नशेतच हणमंत आणि सुशांत यांच्यात वाद झाला असावा. शुक्रवारी रात्री दहा वाजता पुन्हा दोघांमध्ये किरकोळ कारणावरून
वाद झाला होता. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यातून सुशांत याने हणमंत याचा ढाब्यामधील कांदा चिरण्याच्या चाकूने गळा चिरला.त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्‍तस्राव सुरू झाला.

या घटनेची माहिती इतर कामगारांनी ढाबा मालक श्रीकांत दत्तात्रय खोत (रा. वंजारवाडी) यांना दिली. श्रीकांत हे तातडीने घटनास्थळी आले असता हणमंत हा रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. कामगार आणि ढाबा मालक श्रीकांत यांनी खुनातील संशयित सुशांत हा घटनेनंतर पळून जाऊ नये म्हणून पोलिस घटनास्थळी येईपर्यंत त्याला एका खोलीत डांबून ठेवला होता.

गंभीर जखमी अवस्थेत हणमंत याला तासगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. तेथे उपचारा दरम्यान हणमंत याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी जगताप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. संशयित सुशांत याने खून करण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे करीत आहेत.

Back to top button