सांगली : ऊस उत्पादकांची तुटपुंज्या बिलांनी बोळवण | पुढारी

सांगली : ऊस उत्पादकांची तुटपुंज्या बिलांनी बोळवण

इस्लामपूर , संदीप माने :  सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा घाट घातला आहे. खरिपाच्या तोंडावर प्रतिटन 150 ते 200 रुपये ऊस उत्पादकांना देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आंदोलनाचा इशारा देणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेही आता गप्प आहेत.

शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र ऊस हंगामाच्या तोंडावर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडून शेतकर्‍यांची, शेतकरी संघटनांची एकरकमी एफआरपीची मागणी बेदखल केली जात आहे. जादा ऊस दर द्यावा लागेल म्हणून एफआरपीचेच तुकडे पाडण्याचे षङयंत्र कारखानदारांचे असल्याचा आरोप होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची एफआरपीची रक्कम 3 हजार ते 3200 रुपयापर्यंत आहे. तेथील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांची एफआरपी 3 हजार रुपयांपर्यंत असताना कारखान्यांनी पहिली उचल 2500 ते 2600 रुपयांपर्यंत दिली आहे.

आता खरीप हंगामाच्या तोंडावर प्रतिटन 150 रुपये ते 200 रुपयांचा दुसरा हप्‍ता ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करून शेतकर्‍यांची बोळवण केली आहे.

उपपदार्थांचा हिशेब कुठे?
उसापासून साखर निर्मितीबरोबरच उपपदार्थांचे उत्पादन घेतले जात आहे. बहुतांशी कारखान्यांचे वीज, डिस्टीलरी, इथेनॉल निर्मिती प्रकल्पही चांगले सुरू आहेत. बगॅस, मळी, प्रेसमड, राख याच्या विक्रीतूनही कारखान्याला फायदा होत आहे. मात्र बिले मिळत नसल्याने संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Back to top button