

सांगली : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षांत प्रथमच यावेळी सोयाबीनसह अन्य विविध पिकांच्या बियाण्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महागडे बियाणे घेतले तर पाहिजे पण हातात पैसा नाही, अशीच अनेक शेतकर्यांची स्थिती झाली आहे. मात्र, याचवेळी अनेक शेतकरी नवनवीन वाणांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.
मोसमी पावसाचे आगमन आता टप्प्यात आले आहे. शेतकरी खरिपाच्या तयारीत मग्न आहे. शेतकर्यांची बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीसाठी स्थानिक कृषी सेवा केंद्रांत गर्दी होऊ लागली आहे. मात्र, हंगामाची संधी साधून बनावट बियाणे, खतांचे लिकिंग यातून शेतकरीवर्गाची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
गेल्या हंगामात प्रतिक्विंटल सोयाबीनला आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे दहा – साडेदहा हजार रुपयांहून अधिक दर मिळाला. यामुळे यावेळी सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र, पेरणीसाठी बाजारात सोयाबीन बियाणे खरेदी करणार्या शेतकर्यांना महाग दराचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन, भुईमूग बियाणे महाग झाले आहे. विविध कंपन्यांनी बियाणांचे दर वाढविले आहेत.
गत हंगामात सोयाबीन बियाणाची 30 किलोेची पिशवी 2250 रु. ते 2700 रुपयांना मिळत होती. मात्र, यावेळी तीस किलोची पिशवी चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या घरात गेली आहे.
एकीकडे सोयाबीनचे बियाणे महाग झाले आहे. राज्यातील विविध कंपन्यांचे बियाणे शेतकरी घेतात. मात्र, यावेळी प्रथमच परराज्यातील बियाणांनी मोठीच आघाडी घेतली आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेशातील विविध वाणांच्या बियाणांकडे शेतकरी आकृष्ट होऊ लागला आहे. शेतकरी यावेळी प्रथमच स्थानिक वाणापेक्षा नवनवीन संकरित वाणांना पसंती देत आहे. उच्च उतारा असला तरी नामांकित बियाणे हे सामान्य शेतकर्याच्या आवाक्यात राहिलेले नाही हेदेखील तितकेच खरे आहे. मात्र, अपवाद वगळता त्याच्या शुद्धतेबाबत शेतकर्यांतून धास्ती व्यस्त केली जात आहे. 'शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी' असे म्हटले जाते पण जर बियाणातच बनावटगिरी असेल तर त्यातून काय लाभ होणार, असा सवाल होतो आहेच!
सोयाबीन काढणी, मळणीपर्यंतचा एकरी खर्च 16 ते 17 हजार रुपयांच्या घरात येतो. यामुळे आता सोयाबीनची शेती देखील महाग होऊ लागली असल्याचे स्पष्ट होते. बहुतेक शेतकरी उसासाठी नांगरट, खुरटणी आणि सरी सोडलेल्या शेतात सोयाबीन सरीवर टोकतात. यामुळे हा खर्च सोयाबीनसाठी गृहित न धरता या पिकाचा एकरी खर्च ढोबळमानाने मांडता येईल. सोयाबीन काढणीपर्यंतचाच एकरी खर्च 14-15 हजार रुपयांच्या घरात गेल्याचे सोबतच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते.
एकरी सोयाबीनसाठीचा खर्च