सांगली : गुंठेवारी, घरांवरील आरक्षणांचा विषय महासभेपुढे | पुढारी

सांगली : गुंठेवारी, घरांवरील आरक्षणांचा विषय महासभेपुढे

सांगली : पुढारी वृत्तसेवा
गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल करण्यास मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ, घरांवरील आरक्षण उठवणे, भूसंपादन मोबदला, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विकास आराखड्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगरसेवकांनी 1 (ज) खाली दिलेले 15 प्रस्ताव महासभेपुढे आले आहेत.

महापालिकेची महासभा सोमवारी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काही नगरसेवकांनी 1 (ज) अंतर्गत प्रस्ताव दिले आहेत. गुंठेवारी नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास मार्च 2023 पर्यंत मुदतवाढीचा निर्णय व्हावा, असा प्रस्ताव नगरसेवक फिरोज पठाण यांचा आहे. नवीन उभारणी होत असलेली व्यावसायिक संकुले, अपार्टमेंटमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने पुरेसे सीसीटीव्ही कॅमरे लावणे व त्याची योग्य निगा राखण्याच्या अटीवर बांधकाम परवानगी देण्याचा प्रस्ताव वर्षा निंबाळकर यांचा आहे.

भागातील घरांवरील आरक्षण उठवून त्यांना गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रमाणपत्र देणे व खुल्या भूखंडावरील आरक्षण कायम ठेवण्याबाबतचा प्रस्ताव नगरसेवक विष्णू माने व मनगू सरगर यांनी आणला आहे. सांगलीवाडीत ड्रेनेज पंपहाऊससाठी खासगी जागा आर्थिक मोबदला देऊन संपादन करण्याचा विषय हरिदास पाटील यांनी आणला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमबाबतचा प्रस्ताव नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, भारती दिगडे यांचा आहे. तंत्रशुद्ध आणि सर्व खेळांचा समावेश असलेला विकास आराखडा तयार करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. अभयनगर परिसरातील महापालिकेच्या ओपनस्पेसवर अल्पसंख्यांक विकास योजनेतून सद्भावना मंडप बांधण्याच्या मान्यतेचा प्रस्ताव संतोष पाटील यांनी आणला आहेे.

 बायोमेडिकल वेस्टसह दोन्ही प्रस्ताव वगळले : वळवडे

नगरसेविका आरती वळवडे म्हणाल्या, सभागृहात कोणतीही चर्चा न होता महासभेच्या इतिवृत्तात विषय घुसडून बायोमेडिकल वेस्टचा ठेका कोकण केअरला दिला आहे. हा ठेका रद्द करण्याबाबत तसेच दाव्यांच्या वकिली फी संदर्भात आयुक्तांनी महासभेच्या परस्पर केलेली तडजोड महासभेचा हक्कभंग आहे. या दोन्ही विषयांवर चर्चा व्हावी, यासाठी नगरसचिव कार्यालयात प्रस्ताव दिला होता. मात्र हे दोन्ही प्रस्ताव वगळले आहेत. हा अन्याय आहे.

Back to top button