निकाल : दहावी परीक्षेतही मुलींचीच बाजी | पुढारी

निकाल : दहावी परीक्षेतही मुलींचीच बाजी

सांगली : पुढारी वृत्तसेवा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 98.10 टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये बारावीप्रमाणे दहावीलाही मुलींचे सर्वाधिक 98.68 टक्के प्रमाण आहे. कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक 98.92 टक्के निकालाची नोंद झाली. जत तालुक्याचा सर्वात कमी 97.43 टक्के निकाल लागला आहे.

दहावी निकालाबाबत सर्वांना उत्सुकता होती. शुक्रवारी वेळेवर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली. कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 98.94 टक्के निकाल लागला. सातारा जिल्हा 98.29 तर सांगलीचा 98.10 टक्के निकाल लागला.
जिल्ह्यात 38 हजार 301 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 37 हजार 576 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील 17 हजार 183 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. उत्तीर्णामध्ये 13 हजार 659 विद्यार्थ्यांना प्रथम तर 5 हजार 892 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.

मागील काही वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. यंदाही दहावीच्या निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली असल्याचे दिसून येते. यंदा 17 हजार 350 मुलींपैकी 17 हजार 122 मुली उत्तीर्ण झाल्या. त्याचे प्रमाण 98.68 टक्के आहे. 20 हजार 951 मुलांपैकी 20 हजार 454 मुले उत्तीर्ण झाले. मुलांचे पास होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे.
रिपिटरचा निकाल 73.67 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून 914 पुनर्परीक्षार्थींची नोंदणी झाली होती, त्यापैकी 885 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थीमध्ये 18 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे. 93 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 114 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.

जिल्ह्यात दहावीच्या निकालामध्ये कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक 98.92 टक्के निकाल लागला. तर सर्वात कमी जत तालुक्याची 97.43 टक्के निकालाची नोंद झाली. आटपाडी तालुका 98.66, कवठेमहांकाळ 98.46, खानापूर 97.65, मिरज 97.99, पलूस 98.73, सांगली शहर 97.83, शिराळा 98.14, तासगाव 98.30 आणि वाळवा तालुक्याचा 98.37 टक्के निकाल लागला आहे.

440 शाळांचा 100 टक्के निकाल

जिल्ह्यातील 440 शाळांचा दहावी परीक्षेच्या निकाल 100 टक्केलागला आहे. यामध्ये वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 66 शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुका 32, जत 67, कडेगाव 21, कवठेमहांकाळ 30, खानापूर 36, मिरज 47, पलूस 30, शिराळा 32, तासगाव तालुक्यातील 25 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 54 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Back to top button