सांगली : भाळवणी येथे महिला अधिकार्‍याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

सांगली : भाळवणी येथे महिला अधिकार्‍याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

विटा; पुढारी वृत्तसेवा : याप्रकरणी दोघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

प्रभज बाळासाहेब शिंदे व किरण नामदेव सावंत (दोघे रा. भाळवणी, ता. खानापूर) अशी संशयितांची नावे आहेत. भाळवणीच्या मंडलाधिकारी संगीता भानुदास पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री भाळवणी हद्दीत येरळा नदीपात्रात वाळूची चोरी होत असल्याची माहिती मंडलाधिकारी संगीता पाटील यांना मिळाली. त्या तात्काळ मोटारसायकल (एम.एच. 10, बी.पी. 7757) घेऊन घटनास्थळी गेल्या. संशयित शिंदे व सावंत हे शिरगाव- भाळवणी रस्त्यावर शिरगाव हद्दीतील नदीपात्रात वाळूची उपसा करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यावरून मंडलाधिकारी पाटील यांनी त्या दोघांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी फिर्यादी पाटील यांना धाक दाखवून जबरदस्तीने पिकअप गाडी पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पिकअप गाडी मंडलाधिकारी पाटील यांच्या मोटारसायकलवर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये मोटारसायकलचे 30 हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी संशयित शिंदे व सावंत यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे व गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news