कृष्णेची पाणी पातळी निच्चांकी स्तरावर | पुढारी

कृष्णेची पाणी पातळी निच्चांकी स्तरावर

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सांगली बंधार्‍याच्या फळ्या काढल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी निच्चांकी स्तरावर गेली आहे. पाणी पुरवठ्याच्या इंटेकवेल, बाऊल उघडे पडले आहेत. त्याचा पाणी उपशावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सांगली व कुपवाडमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सांगलीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या फळ्या काढल्या आहेत. त्यामुळे पाणी वाहून गेल्याने सांगलीत कृष्णा नदीतील पाणीपातळी निच्चांकी स्तरावर गेली आहे. नदीपात्रातील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विहिरी (इंटेकवेल) उघड्या पडल्या आहेत. एका इंटेकवेल जवळील जमिनीचा भाग दिसू लागला आहे. पाणी पातळी जसजशी कमी होईल तस तसे पंपाच्या पाणी खेचण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यानुसार सध्या सुमारे 15 टक्के पाण्याचा उपसा कमी झाला आहे. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठा यंत्रणेकडूनही महापालिकेला रोज सुमारे दोन एमएलडी पाणीपुरवठा होतो. अशुद्ध पाणी उपसा यंत्रणेकडील तीन स्ट्रेनरपैकी दोन स्ट्रेनर कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. तसेच 200 अश्वशक्ती पंपाचे दोन बाऊल उघडे पडल्यामुळे पंपास पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. सुमारे तीस ते चाळीस टक्के उपशावर परिणाम झाला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रास व नागरी पाणी पुरवठ्यास होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होणार आहे.

नदीची पाणी पातळी निच्चांकी स्तरावर गेली आहे. नदीची पाणीपातळी पुरेशी होईपर्यंत नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

2016 नंतर प्रथमच इंटेकवेल उघड्या पडल्या

कृष्णा नदीतील पाणी पातळी निच्चांकी स्तरावर आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील इंटेकवेल उघड्या पडल्या आहेत. यापूर्वी सन 2016 मध्ये पाऊस न झाल्याने इंटेकवेल उघड्या पडल्या होत्या. सहा वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवल्याचे एका अभियंत्यांनी सांगितले.

Back to top button